खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण

कृष्णकांत कोबल
बुधवार, 20 जून 2018

मांजरी खुर्द - कोलवडी, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द (ता. हवेली) अशा चार गावांच्या शिवा जोडणाऱ्या मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहतूकीला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मांजरी खुर्द - कोलवडी, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द (ता. हवेली) अशा चार गावांच्या शिवा जोडणाऱ्या मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहतूकीला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मांजरी-वाघोली रस्ता ते कोलवडी-केसनंद रस्त्याला जोडणारा व चार गावांच्या सिमेवरून जाणारा हा सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता आव्हाळवाडीपासून कोलवडी मुख्य रस्त्यापर्यंत जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम केले होते. मात्र सध्या या संपूर्ण मार्गावर खड्डे पडलेले आहेत. साईडपट्टया खचलेल्या आहेत. खडी वर येऊन पसरली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणारे शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांना मोठ त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.  

या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढलेली आहे. जवळचा मार्ग म्हणून अनेक प्रवासी या मार्गाचा वापर करीत आहेत. दिवसेंदिवस नागरिकरण वाढत असल्याने रस्त्यावरील भारही वाढू लागला आहे. या परिसरात माहेर, स्नेहालय अशा प्रसिध्द सामाजिक संस्था व होली एंजल्स शाळा काम करीत आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना याच मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र, त्याप्रमाणात रस्ता न्याय देवू शकत नाही. चारही गावच्या शिवेकडील शेतकऱ्यांनाही औतकाठी नेताना, शेतमालाची वाहतूक करताना रस्त्याची मोठी अडचण निर्माण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी वारंवार हा प्रश्र्न सांगितला आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत काहिही कार्यवाही झालेली दिसत नाही.

या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहे. त्यासाठी येथील वाहतुक सुविधा सुधारण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या रस्त्यावर स्या मुरूमीकरण होण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यात शेतकऱ्यांना वाहतुकीच्या मोठ्या प्रश्र्नाला तोंड द्यावे लागणार आहे. 

पंचायत समिती सदस्य नारायण आव्हाळे म्हणाले,""या रस्त्याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत. संबंधीत ग्रामपंचायती व जिल्हापरिषद सदस्य ज्ञानेश्र्वर कटके यांच्याशी चर्चा करून तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्तीबाबत पाठपुरावा केला जाईल. ''

"सध्यातरी जिल्हा परिषदेकडून या रस्त्यावर निधीची तरतूद नाही. त्या-त्या ग्रामपंचायतने या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याशी बोलले जाईल. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही पाठपुरावा केला जाईल.''
ज्ञानेश्र्वर कटके जिल्हापरिषद सदस्य

"हा ग्रामीण रस्ता प्रकार असून या रस्त्याच्या काही अंतरासाठी सरकारच्या 25-15 योजनेतून सुमारे पंधरा लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होईल. सध्या कोणत्याही प्रकारची दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम खाते करू शकत नाही.''
डी. बी. भोसले शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: bad road condition in majari