एक कोटीच्या लॉटरीद्वारे तुम्ही व्हाल कंगाल; फसवणुकीसाठी पाकिस्तानी मोबाईलचा वापर

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

आता केवळ भारतातूनच नाही,तर पाकिस्तानातूनच ऑनलाइन फसवणुकीसाठीचे फोन येत असल्याचे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

पुणे : "तुम्हाला कौन बनेगा करोडपतीमध्ये लॉटरी लागली आहे " असे सांगणारा अनोळखी व्यक्तिचा फोन किंवा मेसेज तुम्हाला आला असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका.  +92 या क्रमांवरुन आलेले फोन कदाचित पाकिस्तानचे असु शकतात, आणि ते तुम्हाला कोटयावधीची लॉटरी लॉगल्याची बतावणी करुन तुमचे बैंक खाते क्षणार्धात रिकामे करु शकतात किंवा तुमचा संवेदनशील डेटा चोरु शकतात. पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फोन, मेसेजबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिला आहे.

आणखी वाचा - चीनकडून सायबर हल्ल्याच्या धोका, अशी घ्या काळजी

पुण्यासह राज्यात आत्तापर्यंत उत्तरेकडील काही राज्यामधील सायबर गुन्हेगार, त्यांचे कॉल सेंटर यांच्याकडुन नागरीकाशी ई-मेल, व्हाटसअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडीयाद्वारे सर्वसामान्य नागरीकांशी संपर्क साधत, त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या बैंक खात्याची गोपनीय माहिती, ओटीपी क्रमांक मिळवुन त्यांच्या बैंक खात्यातील लाखो रूपये रुपये काढले जात असल्याचे चित्र होते. सध्या हे चित्र काही प्रमाणात बदलत असून, आता केवळ भारतातूनच नाही,तर पाकिस्तानातूनच ऑनलाइन फसवणुकीसाठीचे फोन येत असल्याचे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे. ऑनलाइन फसवणुकीचा हा फिशिंगचा प्रकार असल्याचे स्पष्ट होऊ लागले. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काय आहे +92? 
प्रत्येक देशाना आंतरराष्ट्रीय फोन कॉल करण्यासाठी त्यांचे "कंट्री कॉलिंग कोड" आहेत.भारताचा कंट्री कॉलिंग कोड हा +91 या क्रमांकाने सुरु होतो. त्याच प्रमाणे इतर देशानाही अशा पद्धतीचे क्रमांक आहेत. त्यामध्ये पाकिस्तानला +92 हा क्रमांक आहे. सुरुवातीला +92 असा क्रमांक दिसणाऱ्या मोबाईल वरुन आलेल्या फोनद्वारे नागरीकांची ऑनलाइन फसवणुक केली जात असल्याचे महाराष्ट्र सायबर पोलिसांचे म्हणने आहे. अनेक लोकांना असे फोन आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. व्हॉट्सअप कॉल किंवा गूगल डुद्वारे ही फोन येऊ शकतात.

Image may contain: 1 person

फोनद्वारे होणाऱ्या गुन्हाच्या दोन पद्धती
पहिला प्रकार हा "केबीसी लॉटरी" आहे. +92 क्रमांकावरुन आलेल्या फोनवरील व्यक्ती तुम्हाला तुम्ही भाग्यवान आहात, एक कोटीच्या केबीसी लॉटरीसाठी तुमची निवड झाली आहे, असे सांगुन केबीसीच्या लोगोचा वापर करुन तुम्हाला व्हाट्सअपवर फोटो पाठवतात. त्यानंतर तुमच्या बैंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन पैसे काढतात. तर दुसऱ्या प्रकारातही याच पद्धतीने नवी कोरी कार तुम्हाला मिळाली असल्याचे सांगुन ही कार पाठविण्यासाठी विविध प्रकारचे शुल्क लागत असल्याचे स्पष्ट करीत ऑनलाइन फसवणुक करतात.

आणखी वाचा - ऑनलाईन जेवण मागवत असाल तर ही बातमी वाचा

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

  • कंट्री कॉलिंग कोड +92 वरुन आलेला फोन किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका
  • वैयक्तिक किंवा बैंक विषयीची गोपनीय माहिती कोणाला देऊ नका
  • आपण लॉटरी घेतलेली नसल्याने विजेते होण्याचा प्रश्नच नाही, हे लक्षात ठेवा
  • प्रक्रिया शुल्क भरा किंवा आगाऊ रक्कम द्या असा विषय आल्यास फसविले जान्याची दाट शक्यता 
  • कुठलीही लिंक किंवा मेसेजवर क्लिक करु नका
  • तुमचे व्हॉट्सअप प्रोफाइल, संपर्क क्रमांक, स्टेट्स कोणी बघणार नाही अशी व्यवस्था करा

इथे साधा संपर्क
कंट्री कॉलिंग कोड +92 किंवा अशा प्रकारचे फोन आल्यास पोलिसांशी किंवा टेलीकॉम सर्विस प्रोव्हायडच्या (टिएसपी) 1800110420 किंवा 1663 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bait for one crore lottery pakistani numbers cyber crime