‘बालकुमार’ अजूनही वादाच्या भोवऱ्यातच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

संस्थेची सर्व कागदपत्रे देण्यास तयार आहे; पण अद्याप मला कोणीही विचारलेले नाही. त्यामुळे कागदपत्रे माझ्याकडेच आहेत. आठवडाभरात बैठक घेऊन अंतर्गत वाद मिटवला जाईल. जुन्या संस्थेच्या नावाने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी बॅंकेत जमा आहे.
- अनिल कुलकर्णी, माजी कोशाध्यक्ष

पुणे - जुनी संस्था बरखास्त करून नवी संस्था सुरू केल्याने बालकुमार संस्थेसमोरील वाद मिटतील आणि संस्था पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुरू होईल, असे अनेकांना वाटत होते; मात्र काही आडमुठ्या पदाधिकाऱ्यांमुळे संस्थेसमोरील वाद मिटता मिटेनात. त्यामुळेच संस्थेचे बालकुमारांसाठीचे अनेक महत्त्वाचे उपक्रम रखडलेल्या स्थितीत आहेत.

कायद्यानुसार जुनी संस्था बरखास्त करून नवीन संस्था स्थापन करण्यात आली; पण नवी संस्था सर्वांना विचारात घेऊन स्थापन केली नाही. त्यामुळेच संस्थेची सर्वसाधारण सभा बोलावून त्यात एक विशेष समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीने जुन्या संस्थेच्या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करावा, असा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला; पण या समितीकडे माजी कोशाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी अद्याप कागदपत्रेच सुपूर्द केली नाहीत. त्यामुळे संस्थेसंदर्भात कुठल्याही नव्या हालचाली होताना दिसत नाहीत.

संस्थेचे माजी अध्यक्ष न. म. जोशी म्हणाले, ‘‘संस्था लवकर सुरू करावी, असे आमच्या मनात आहे; पण हे प्रत्यक्षात आणता येत नाही. कुलकर्णी यांनी संस्थेची कागदपत्रे स्वत:च्या घरात ठेवली आहेत. ती त्यांनी समितीकडे देणे आवश्‍यक होते. तसे घडले नाही. त्यामुळे त्यांना संस्थेतर्फे जाब विचारला जाईल. प्रसंगी कायदेशीर पाऊल उचलले जाईल. ‘बालकुमार’च्या नावाने त्यांनी सुरू केलेली नवी संस्थासुद्धा बेकायदेशीरच आहे. त्यामुळे आता तिसरीच बालकुमार संस्था सुरू केली जाऊ शकते.’’

माजी कोशाध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ‘‘गोंधळामुळे संस्थेची बरीच कामे रखडली आहेत. गेली अनेक वर्षे ‘जीवनगौरव पुरस्कार’ही देऊ शकलो नाही. बालकुमार संमेलनासाठी निमंत्रणे येत आहेत; पण संमेलन घेता येऊ शकत नाही, अशी सद्यःस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयाची सर्व पदाधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करायला हवी. संस्थेचे मालक असल्याप्रमाणे कोणी वागू नये.’’

Web Title: Bal Kumar organization disputes

टॅग्स