Vidhan Sabha 2019 :  मावळातून बाळा भेगडे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा संधी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने अखेर राज्याचे कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभा 2019 
वडगाव मावळ - मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने अखेर राज्याचे कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाने यापूर्वीच्या परंपरेला छेद देत भेगडे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली आहे, त्यामुळे तालुक्‍यात गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या उमेदवारीबाबत लागून राहिलेली उत्कंठा संपुष्टात आली आहे. मात्र, आता पक्षातील इतर प्रबळ इच्छुक कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सव्वाशे जणांच्या पहिल्या उमेदवार यादीत भेगडे यांचे नाव न आल्याने तालुक्‍यात उलट-सुलट चर्चा होती; परंतु बुधवारी रात्री जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत भेगडे यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. उमेदवारीसाठी भाजपमध्ये या वेळी कधी नव्हे इतकी स्पर्धा झाली होती. राज्यमंत्री भेगडे यांच्यासह तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व "भाजयुमो'चे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनीही उमेदवारीसाठी जोर लावला होता, त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. पक्षाने यापूर्वी तिसऱ्यांदा उमेदवारीची कोणालाच संधी दिली नसल्याची परंपरा राहिल्याने इतर इच्छुकांना उमेदवारीच्या आशा होत्या; परंतु पक्षाने तीन महिन्यांपूर्वी मंत्रिपद बहाल केलेल्या भेगडे यांच्यावरच पुन्हा विश्‍वास दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bala Bhegade gets a third chance from BJP