"बालभारती'वर साकारला "डॉक्‍युड्रामा' 

सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 28 डिसेंबर 2016

"बालभारती'चा प्रेरक इतिहास आणि संस्थेने आजवर केलेली प्रगती नव्या पिढ्यांना समजावी म्हणून "डॉक्‍युड्रामा' आणि मराठी, इंग्रजी भाषेतील "कॉफी टेबल बुक' तयार करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. यातूनही "बालभारती' अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. 
- सुनील मगर, संचालक, बालभारती 

उलगडणार सुवर्णमय वाटचाल; लवकरच यू-ट्यूबवरून पाहता येणार 

पुणे : "बालभारती' हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर पाठ्यपुस्तके आणि संस्थेची इमारत येते; पण "बालभारती' हा शब्द कोठून आला असे विचारले तर उत्तर सांगता येणार नाही... अगदी या प्रश्‍नापासून "बालभारती' कधी जन्माला आली, कोट्यवधी पुस्तके वेळेत कशी तयार होतात, त्यात गेल्या 50 वर्षांत कसे बदल होत गेले, अनेक दिग्गज लेखक-चित्रकार "बालभारती'शी कसे जोडले गेले... अशा अनेक गोष्टी प्रथमच "डॉक्‍युड्रामा'च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहेत. 

पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अनेकांना घडविणाऱ्या आणि प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या "बालभारती'चे अस्तित्व संपविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा टप्प्यावर "बालभारती काय आहे' हे सांगणारा "डॉक्‍युड्रामा' आपल्या सर्वांसमोर येणार आहे. संस्था जानेवारी महिन्यात सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने संस्थेने "डॉक्‍युड्रामा' आणि संस्थेची वाटचाल उलगडणारे "कॉफी टेबल बुक' हे महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. 

"डॉक्‍युड्रामा'ची जबाबदारी "इमेज मीडिया'च्या माध्यमातून दिग्दर्शक भाई डोळे यांच्याकडे सोपविली आहे. यात माधव अभ्यंकर, संज्योत हर्डीकर, रुमानी खरे यांनी भूमिका साकारल्या आहेत. याचे प्रवीण जोशी यांनी लेखन केले. यासंदर्भात डोळे म्हणाले, ""सेनापती बापट रस्त्यावर "बालभारती' ही संस्था आहे, इतकेच आपल्याला माहिती असते; पण तेथे नेमके काय चालते, कधीपासून ही संस्था आपल्या सर्वांसाठी झटत आहे, इथल्या कामकाजाची पद्धत काय, गावपातळीपर्यंत पुस्तके कशी पोचवली जातात...

याचा विचार करताना अनेक गोष्टी समोर आल्या आणि तिथूनच हा "डॉक्‍युड्रामा' आम्ही सुरू केला. तीन पिढ्यांतील संवादातून तो पुढे जातो. यावर गेल्या तीन-चार महिन्यांपासून आमचे काम सुरू होते. मागील आठवड्यात "बालभारती'त याचे चित्रीकरणही पूर्ण केले. सध्या हा "डॉक्‍युड्रामा' अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तो यू-ट्यूबवरूनही पाहता येईल.'' 
 

Web Title: "Balabharati played on" Docudramas'