शेतीमालाला हमीभाव द्यायची वेळ आली - श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे - ""शेतकऱ्यांनी जे पेरले ते उगवत नाही, अशी परिस्थिती सध्या झाली आहे. ज्यांचे पेरलेले उगवले त्याला कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून हमीभाव दिला पाहिजे. कृषितज्ज्ञांच्या समीकरणामध्ये न अडकता राज्य सरकारकडून शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याची वेळ आता आली आहे,'' असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. 

नवी पेठ येथील पत्रकार भवनात पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्या वतीने राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांना "देशभक्त बाळासाहेब भारदे पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीनिवास पाटील बोलत होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय भारदे आदी उपस्थित होते. 

श्रीनिवास पाटील म्हणाले, ""बाळासाहेब भारदे यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशभक्त आणि स्वातंत्र्योत्तर देशरचना केली. महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री असताना त्यांनी सहकार क्षेत्राची पायाभरणी केली. सहकार क्षेत्राला सरकारचे हस्तांदोलन असावे हस्तक्षेप नको, अशी त्यांची भूमिका होती. कृषिमूल्य आयोग ही देखील त्यांची संकल्पना होती.'' 

कडू म्हणाले, ""निवडणुकीमध्ये जात, धर्म आठवणाऱ्यांना अपंगांना मदत करण्याची आठवण का राहत नाही. ज्या दिवशी लोक मंदिर आणि मशिदीत जाण्यापेक्षा रुग्णालयात जातील त्याच दिवशी देशात क्रांतीची पाऊलवाट बदलेल. डॉ. डी. वाय. पाटील आणि डॉ. विश्‍वनाथा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अजय भारदे यांनी प्रास्ताविक केले. 

आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्यातून वाचलो त्यानंतरचे आयुष्य शेतकऱ्यांसाठी संघर्षात घालविले. आता कृषिमूल्य आयोगाच्या माध्यमातून हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
-पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग 

Web Title: Balasaheb Bharade award distribution