बालभारती - पौड फाटा मार्ग लवकरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

पुणे - पौड रस्ता, कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यास पर्याय ठरणाऱ्या बालभारती ते पौड फाटादरम्यान रस्त्यासाठी महापालिकेकडून पर्यावरण आणि वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. सल्लागारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उच्च न्यायालयासमोर माहितीसाठी सादर करून रस्त्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे.

 त्यामुळे गेल्या एक तपाहून अधिक काळ रखडलेला हा रस्ता मार्गी लागण्याच्या दृष्टीने महापालिकेचे एक पाऊल पुढे पडले असल्याचे मानले जात आहे.

पौड रस्त्यासह तीन रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून २००७ मध्ये २०५ कलमाखाली हा रस्ता टाकण्यात आला होता. त्यासाठी निविदाप्रक्रिया राबवून कामाचे आदेशही देण्यात आले होते.

परंतु, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता या रस्त्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले होते. त्याला विरोध करीत काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर स्थगिती आदेश देताना न्यायालयाने याचिकाकर्ते आणि महापालिकेने संयुक्तरीत्या यावर कार्यवाही करावी, असे आदेश दिले. त्यामुळे या रस्त्याचे काम थांबले होते. 

दरम्यान, महापालिकेकडून जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात बालभारती ते पौड फाटादरम्यान २ किलोमीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा रस्ता दर्शविण्यात आला होता. त्या आराखड्यास राज्य सरकारकडून जानेवारी २०१७ मध्ये मान्यता देण्यात आली. हरकती-सूचनांची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आराखड्यात हा रस्ता दर्शविण्यात आल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आमदार विजय काळे यांनी पुढाकार घेत महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये या रस्त्यामुळे वाहतूक आणि पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला असून, त्यांना पाच महिन्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला आहे. 

 सल्लागाराची नेमणूक करून या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली होती. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागण्यातील मोठी अडचण दूर झाली आहे. हा रस्ता झाल्यानंतर पौड रस्ता,  कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
- विजय काळे, आमदार

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये याचिकाकर्त्यांचा देखील समावेश होता. त्यांची मान्यता घेऊनच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 
- अनिरुद्ध पावसकर, पथविभाग प्रमुख, महानगरपालिका

Web Title: Balbharati Paud Road work Traffic