बालचित्रपट पाहण्याची लहानग्यांना पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

आजचा चित्रपट - ‘दुसऱ्या जगातली’
महोत्सवाला ‘पिकुली’ या चित्रपटाने सुरवात झाली. उद्या (ता. १६) ‘दुसऱ्या जगातली’, बुधवारी (ता. १७), ‘मुझसे दोस्ती करोगे’, गुरुवारी (ता. १८), ‘मुन्ना’, शुक्रवारी (ता. १९), ‘श्‍यामची आई’ आणि शनिवारी (ता. २०) ‘छोटा सिपाही’ हे चित्रपट मुलांना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रोज सकाळी दहा ते १२ या वेळेत मोफत दाखविले जाणार आहेत.

पुणे - ऐन सुटीच्या काळात लहानग्यांना बालचित्रपट पाहण्याची पर्वणी मिळाली अन्‌ सैनिकी शाळेतील मुलांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. मुलांना २० एप्रिलपर्यंत विविध बालचित्रपट मोफत पाहता येणार आहेत. 

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि संवाद पुणे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन आज नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील (फुलगाव) विद्यार्थ्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे, राजीव कावरे, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, किरण धिवार, सुनील महाजन, नीकिता मोघे, संजय पाटील या वेळी उपस्थित होते. 

डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘‘केवळ मुलांसाठी अव्याहतपणे सुरू असलेला हा सुंदर उपक्रम आहे. चित्रपटांचा आस्वाद कशा पद्धतीने घ्यावा, हे अशा चित्रपटांमधूनच कळते.’’

तांबे म्हणाले, ‘‘व्रत घेतल्याप्रमाणे बालचित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. वैविध्यपूर्ण चित्रपटातून मुलांच्या अनुभवाचे क्षितिज मोठे होते. अशा उपक्रमांचा मुलांनी निश्‍चित लाभ घ्यावा.’’

कावरे म्हणाले, ‘‘बालचित्रपट महोत्सवामुळे तीन पिढ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. अशा महोत्सवातून लहान मुलांना दर्जेदार चित्रपट बघायला मिळतात.’’ 

महाजन यांनी चित्रपट महोत्सव आयोजनामागील भूमिका विशद केली, तर संस्थांनी चित्रपट पाहण्याची संधी दिल्याबद्दल सैनिकी शाळेतील विद्यार्थी शंतनू जोशी आणि धनश्री पांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Balchitrapat Child Entertainment