पुणे मेट्रोसाठी बालेवाडीची जागा

पुणे मेट्रोसाठी बालेवाडीची जागा

पुणे - पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्‍टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मेट्रो प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनामार्फत या प्रकल्पास कोणताही अर्थपुरवठा केला जाणार नाही. त्यासाठी प्राधिकरणास हस्तांतरित होणाऱ्या शासकीय व खासगी जमिनीच्या वाणिज्यिक विकासातून निधीची उभारणी करण्यात येणार आहे. त्यानुसार निधी उभारण्याचा एक स्रोत म्हणून बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४/१/१ मधील ५ हेक्‍टर ६० आर इतकी शासकीय जमीन पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

आजच्या निर्णयानुसार या शासकीय जमिनीतून मंजूर विकास योजनेअंतर्गत ३० मीटर व १८ मीटर विकास योजना रस्त्याच्या प्रस्तावाने बाधित होणारे क्षेत्र वगळून उर्वरित जमीन महसूल अधिनियम -१९६६ च्या कलम ४० मधील तरतुदीनुसार भोगवटामूल्य विरहित पद्धतीने देण्यात येणार आहे. या जमिनीचा व्यावसायिक विकास करताना त्रयस्थ हितसंबंध (थर्ड पार्टी इंटरेस्ट) निर्माण करता येतील, असाही निर्णय घेण्यात आला.

पुण्यातील वाहतूक नियोजनासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतुकीची समस्या दूर होईल. पुण्यातील वाहतूक गतिमान होऊन नागरिकांचा वेळ वाचेल. पुणे शहरातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.
- गिरीश बापट, पालकमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com