बालगंधर्वचा आराखडा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले, तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. याला सांस्कृतिक क्षेत्रासह काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.

या निर्णयासंदर्भात कलाकार, रंगकर्मी, तज्ज्ञ आणि प्रेक्षकांची समिती नेमली असून, तिच्या सूचनांचा आदर करून निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय अमलात येणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

मात्र, या निर्णयाला सांस्कृतिक क्षेत्रातून विरोध झाला. त्यामुळे त्यावर कार्यवाही रखडली होती. परिणामी, हा निर्णय रखडण्याची चिन्हे होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शुक्रवार जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले असून, बालगंधर्व पाडले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रंगमंदिराच्या पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदांनी नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाने म्हटले आहे. 

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘यासंदर्भात समिती नेमली असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाही होईल. त्यानंतरच नूतनीकरण केले जाईल.’’ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या प्रक्रियेला विरोध केला आहे.

शिंदे यांचा पाठिंबा 
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र पालिकेच्या निर्णयास पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘सध्याची इमारत पाडून बहुउद्देशीय रंगमंदीर बांधल्यास पुणेकरही पाठिंबा देतील.’’

पुण्याचा सांस्कृतिक ठेवा
बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन  ८ ऑक्‍टोबर १९६२ रोजी झाले. त्यानंतर २६ जून १९६८ या दिवशी रंगमंदिराचे उद्‌घाटन झाले. हे रंगमंदिर पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. तसेच नाट्यक्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे या रंगमंदिराने पाहिली आहेत.  

Web Title: Balgandharva rangmandir draft soon