बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना योग्य प्रतिसाद न दिल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिला. 

बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने "मराठी संगीत रंगभूमी पुनरुत्थान' विषयावर महाराष्ट्र साहित्य परिषदेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साखवळकर यांनी मराठी संगीत रंगभूमीसंदर्भातील विविध प्रश्‍नांबाबत पत्रकाराशी संवाद साधला. मंडळातर्फे आयोजित चर्चासत्रात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, अरविंद पिळगावकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, मधुवंती दांडेकर, सुहास व्यास, मुकुंद मराठे, बकुळ पंडित, डॉ. विकास कशाळकर, रवींद्र कुलकर्णी, अस्मिता चिंचाळकर यांसह मुंबई, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी शहरातील नाट्यसंस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 
 
संगीत नाटकांसंदर्भातील प्रमुख मागण्या : 
- सरकारतर्फे दरवर्षी संगीत नाट्यसंमेलन व्हावे 
- संगीत नाट्य अकादमी उभारावी 
- नवोदित कलाकारांच्या नाट्यसंगीत स्पर्धा व्हाव्यात 
- संगीत नाट्यसंस्थांना अनुदान मिळावे 
- संगीत नाटक सादर करण्यासाठी नाममात्र दराने नाट्यगृहे उपलब्ध व्हावीत 

''नाट्यसंस्कृतीची परंपरा अव्याहत जपणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडू नये. ही इमारत पाडून महापालिकेला बहुमजली इमारत उभी करून अधिकाधिक महसूल मिळवायचा आहे. रंगमंदिराच्या जुन्या वास्तूचे संवर्धन करून महापालिकेने त्याबाजूला दुसरी बहुमजली इमारत उभी करावी.''
- सुरेश साखवळकर, अध्यक्ष, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ 
 
Web Title: Balgandharvha Music Audience Group warns of agitation