जेव्हा कमळ ‘जिवंत’ होतं...

जेव्हा कमळ ‘जिवंत’ होतं...

पुणे - एकाचवेळी सौंदर्याचं लेणं, मांगल्याचं सार, जीवनाचं दर्शन, आध्यात्मिक स्थान, प्रियजनांची सोबत, अशा साऱ्यासाऱ्या गोष्टी अन्‌ त्याही एकाच कुठच्या फुलाला निसर्गदत्तपणे मिळाव्यात; हे म्हणजे अगदीच नशीबानेच घडल्यासारखं म्हणायला हवं. कमळाचं फूल हे याबाबतीत नशीबवान. त्याला एकाचवेळी देखणं रूपही लाभलं आणि दुसरीकडे जनसामान्यांपासून तर ग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे साक्षात देवादिकांच्या सान्निध्यात जाऊन बसण्याचं मानाचं स्थानही. मग अशा कमळाला वाहिलेल्या संहितेवर झालेल्या एका देखण्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून उपस्थिती लावली नसती तरच नवल ! अतिशय आगळावेगळा असा ‘कमलानुभव’ देणारा ‘पद्मिनी’ हा तो कार्यक्रम.

खरंतर, ‘पद्मिनी’विषयी सांगायचंच झालं, तर त्याला शब्द-सूर-नृत्याचा त्रिवेणी संगमच म्हणता यावं. कमळ या केवळ एकाच पुष्पाचा संदर्भ घेत समोरच्याला नक्की किती निरनिराळ्या विषयांची सफर घडवता येत असेल, याचं एक देखणं उदाहरण म्हणजे हा आविष्कार होता. रविवारच्या सकाळी दर्दी रसिकांच्या गर्दीने भरलेल्या गच्च सभागृहाला त्याने एका वेगळ्याच विश्‍वात नेऊन ठेवलं. या सगळ्याचं श्रेय ते हा आविष्कार घडवणाऱ्या चार प्रमुख जणांना आणि त्यांच्या टीमला. 

आपली वैद्यकीय सेवा सांभाळतानाच छायाचित्रकलेचा छंद जोपासणारे पुणेकर डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी अनेक वर्षे कमळांची विविध कोनांतून काढलेली देखणी छायाचित्रं आणि त्यांवर सिद्ध केलेला त्यांचा ‘पद्मिनी’ हा ग्रंथ म्हणजे ‘पद्मिनी’ या कलाविष्काराचं मूळ. त्याला दृश्‍यरूप देताना या कार्यक्रमाची गोळीबंद संहिता साकारणाऱ्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, या संहितेला साजेसं संगीत रचणारे डॉ. धनंजय दैठणकर आणि कमळाच्या सौंदर्याला पूरक ठरतील, अशा नेत्रदीपक नृत्यरचना रचणाऱ्या डॉ. स्वाती दैठणकर, सहनिवेदक अक्षय वाटवे आणि त्यांच्या सहकलाकारांनी घेतलेली अथक मेहनत फळाला येणं काय, हे अनुभवण्यासाठी हा कलाविष्कार अनुभवण्यास हवा. त्यातही त्यात ऐकायला मिळालेले कमळांशी संबंधित श्‍लोक, ओव्या आणि अनेक उतारे हेही महत्त्वाचे.

पहिल्यावहिल्या किरणांचा अनुनय करणारं सूर्यविकासी कमळ, लाजत लाजत एकेका पाकळीने उमलणारं एखादं; तर कधी ‘उमलू की नको’, अशा आविर्भावात असणारं एखादं कमळ, एखादं समोरच्या पाण्यात आपलं रूपडं निरखणारं कमळ, श्‍वेत-नील-तांबडं कमळ... अशा अनेकविध कमळांशी मनमोहक भरतनाट्यम रचनांमधून रसिकांना संमुख करत या आविष्काराने उपस्थितांच्या मनांत आपलं स्थान पक्कं केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com