#MarathaKrantiMorcha मावळातही कडकडीत बंद

#MarathaKrantiMorcha  मावळातही कडकडीत बंद

वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मावळ तालुका मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण तालुक्‍यात कडकडीत बंद पाळून समाजाच्या सर्व घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव-तळेगाव फाट्यावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर द्रुतगती मार्ग, महामार्ग, रेल्वे स्थानके आदी सार्वजनिक ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मावळ तालुका मराठी क्रांती मोर्चानेही आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी मावळ बंदची हाक दिली होती. विभागवार बैठका घेऊन या बंदचे नियोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन वडगाव, कामशेत, तळेगाव दाभाडे, लोणावळा, देहूरोड, पवनानगर, इंदोरी, टाकवे बुद्रुक आदी मोठ्या शहरांसह छोट्या-छोट्या गावातही व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. वडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, इतर शासकीय कार्यालये, बॅंका आदींचे कामकाज ठप्प झाले होते. अनेक शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. रिक्षा संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. गुरुवारी येथे भरणारा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे एरवी गजबजणाऱ्या बाजारात शुकशुकाट दिसून आला. 

महामार्गावर रास्ता रोको
तालुक्‍यातील विविध ठिकाणी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सर्व भागातील कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन मोटारसायकल रॅलीने पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव- तळेगाव फाट्यावर एकत्र आले व त्यांनी रस्त्यातच ठिय्या मारून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. मराठी असूनही खासदार श्रीरंग बारणे व आमदार बाळा भेगडे हे आंदोलनात सहभागी न झाल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे, विजय काळोखे, कल्पेश मराठे, दिनकर शेटे, अमोल ढोरे, बाबाराजे देशमुख, सिद्धेश ढोरे, दत्तात्रेय पडवळ आदींनी मनोगत केले. सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास नऊ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल. माजी मंत्री मदन बाफना, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तहसीलदार रणजित देसाई यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, लोणावळा विभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवतरे, वडगावचे पोलिस निरीक्षक दगडू हाके आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

चऱ्होलीत सभा
चोविसावाडीमध्ये मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शंभुराजे कुस्तीकेंद्राजवळ सभा घेतली. या वेळी विजय रसाळ, देविदास तापकीर, राजू तापकीर, अशोक तापकीर, काळूराम तापकीर, सावळाभाऊ बुरडे उपस्थित होते.

कामशेत बाजारपेठ बंद
कामशेत - कामशेतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. एरवी गर्दीने गजबजलेली कामशेत बाजारपेठ पूर्णपणे शांत होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. शाळा व महाविद्यालये बंद होती. या बंदला व्यापारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला होता. रिक्षा व सहा आसनी रिक्षा, बससेवा, खासगी वाहतूक पूर्ण बंद होती. कामशेत स्टेशनमधून सुरू झालेला मोर्चा साईबाबा चौक, गणपती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुंबई-पुणे महामार्गावर आला. सभेत कैलास गायकवाड, दत्तात्रेय शेवाळे, दिनेश बोडके, आदेश कोंढरे, सुधीर वीर यांची भाषणे झाली. सुमारे एक तास महामार्ग रोखण्यात आला. काकासाहेब शिंदे व सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कामशेत मुस्लिम समाज, जैन समाज तसेच इतर मागासवर्ग संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com