क्षणार्धात हेल्थ स्टेटसची माहिती देणार ‘बॅंडेज’

सम्राट कदम
Thursday, 4 March 2021

बदलती जीवनशैली आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळोवेळी आरोग्याची स्थिती माहिती असणे आवश्यक आहे. शरीराची चयापचय क्रिया सुस्थितीत चालू आहे की नाही, हे तपासणारी उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत.

घामाच्या माध्यमातून कळणार आरोग्याची स्थिती; आयआयटी मुंबईचे संशोधन 
पुणे - बदलती जीवनशैली आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळोवेळी आरोग्याची स्थिती माहिती असणे आवश्यक आहे. शरीराची चयापचय क्रिया सुस्थितीत चालू आहे की नाही, हे तपासणारी उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी घामाच्या माध्यमातून क्षणार्धात आरोग्याची स्थिती कळविणारा ‘बॅंडेज’च्या आकाराचा जैवसंवेदक (बायोइंडिकेटर) विकसित केला आहे. ज्यामुळे कमी खर्चात पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. 

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) आणि अमेरिकेच्या टफ्ट्स विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. एनपीजे फ्लेक्झीबल इलेक्ट्रॉनिक्स या शोधपत्रिकेत प्रकाशित या संशोधनाला अमेरिकन संरक्षण विभागाच्या सेंटर फॉर ॲप्लाइड ब्रेन ॲण्ड कॉग्नेटीव्ह सायन्सेस (सीएबीसीएस) आणि केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास विभागाच्या ‘एसपीएआरसी’चे आर्थिक साहाय्य लाभले आहे. शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाच्या विश्र्लेषणातून केवळ आरोग्याची स्थिती नव्हे तर आजारांचे निदान करण्याचीही क्षमता आहे, असे मत टफ्ट्स विद्यापीठाचे प्रा. समीर सोनकुसळे यांनी व्यक्त केले आहे. तृप्ती तेरसे- ठाकूर, मीरा पुंजिया, झिंपल माथूर, प्रा. मरियम शुजाय आदींचा संशोधनात सहभाग आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे जैवसंवेदक  

  • सोडिअम, अमोनिअम, शर्करा यांचे विश्लेषण करणारे तीन संवेदक (सेन्सर).
  • कार्बनचे आवरण लावलेले विशिष्ट पॉलिमरचा वापर करून हे संवेदक विकसित करण्यात आले. 
  • हे तिन्ही संवेदक इलेक्ट्रॉनिक सर्किटला जोडलेले असून, त्याची स्मार्ट फोनवर रिअल टाइम माहिती मिळते.

वीज तोडून नाही, तर हात जोडून 'महावितरण' करणार बिलांची वसुली

बॅंडेज जैवसंवेदकाचे फायदे  

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण, प्रथिनांचे पचन, ऑक्सिजनची पातळी, स्नायूंची तंदुरुस्ती समजणार. डाएट आणि व्यायाम करताना उपयुक्त.
  • संपूर्ण चयापचय क्रियेबरोबरच (मेटाबॉलिझम) यकृताची कार्यक्षमता स्पष्ट होते.
  • बॅंडेजच्या स्वरूपात असल्यामुळे हात, कपाळ, कमरेला सहज लावणे शक्य.
  • कापडाचा बॅंडेज असल्यामुळे विघटन होते, सोबतच इलेक्ट्रॉनिक सर्किटचा पुनर्वापर होतो.
  • स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्यायामुळे तीस सेकंदात निदान होते.

अगदी सहजपद्धतीने आणि कोणताही त्रास न होता शरीराला हा जैवसंवेदक लावता येतो. अतिशय कमी किमतीत उपलब्ध होणारा हा बॅंडेज स्वरूपातील जैवसंवेदक वापरानंतर सहजरित्या विघटित होतो. घामाच्या माध्यमातून निदानासाठी एक स्मार्ट पर्याय याद्वारे उपलब्ध झाला आहे. 
- प्रा. समीर सोनकुसळे, वरिष्ठ संशोधक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandage will give information about health status in a moment