"शिरूर'मध्ये मनसेकडून बांदल? 

"शिरूर'मध्ये मनसेकडून बांदल? 

राज ठाकरे यांच्याकडून संकेत; ओतूरला स्टेडियमचे उद्‌घाटन 

ओतूर - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मनसेकडून उमेदवारीचे संकेत देताना आमदार शरद सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. 

ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात आमदार सोनवणे यांनी स्वतः 75 लाख रुपये खर्चून उभारलेल्या माजी आमदार कै. श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) स्टेडियमचे उद्‌घाटन व लोकार्पणप्रसंगी ठाकरे बोलत होते. 

""या स्टेडिअमची भव्यता पाहता महाराष्ट्रात असा आखाडा असेल, असे वाटत नाही. मी असे आमदार पाहिले आहेत की, ज्यांनी लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले, सोनवणे यांनी मात्र लोकांसाठी खिशातला पैसा बाहेर काढला. असे जर 288 आमदार मिळाले, तर मी काय महाराष्ट्र घडवीन, हे तुम्ही पाहाल,'' असे ठाकरे म्हणाले. बांदल यांच्या मागणीबाबत सोनवणे यांच्याबरोबर विचारविनिमय करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
या वेळी बांदल, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भोंडवे, महाराष्ट्र केसरी अभिजित खटके, पिंपरीचे महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, "विघ्नहर'चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, संचालक धनंजय डुंबरे, श्री कपर्दिकेश्वर देव- धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, वसंत पानसरे, महेंद्र पानसरे, वैभव तांबे, सरपंच बाळासाहेब घुले व पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था व ओतूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार सोनवणे यांची पेढ्यांची तुला करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते (कै.) पोपटराव मारुती पानसरे यांना जाहीर झालेला मरणोत्तर ओतूरभूषण पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला. ओतूरच्या सुपुत्री, खेड तालुक्‍याच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनाही ओतूरभूषण पुरस्कार देऊन राज ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सचिन घोलप व आर्किटेक्‍ट अरविंद वैद्य यांचाही सन्मान करण्यात आला. भाऊसाहेब खाडे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय डुंबरे यांनी आभार मानले. 

या भागात आमदार शरद सोनवणे यांचे काम चालू आहे, तसेच तुम्ही हो म्हणा, शिरूरचा खासदारही तुमचाच होईल. 
मंगलदास बांदल, माजी बांधकाम सभापती, पुणे जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com