Video : पवारांसाठी बारामतीकर उतरले रस्त्यावर

मिलिंद संगई
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्या विरुद्ध ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज बारामतीकर रस्त्यावर उतरले आहेत.

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईडीने नोटीस पाठविल्याचे जोरदार पडसाद आज बारामतीत उमटले. असंख्य बारामतीकर आज या कारवाईने संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. आज बारामतीकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे बंद पाळून शरद पवार व अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. 

आजचा बंद हा कोणीही पुकारलेला नव्हता, लोकांनी उत्स्फूर्तपणे ही कृती केल्याची माहिती पुढे आली. सकाळी दहाच्या सुमारास बारामतीतील भिगवण चौकात बारामतीकर जमा झाले व एकच वादा अजितदादा, कोण आला रे कोण आला, मोदी शहांचा बाप आला, पवारसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है....अशा घोषणा लोकांनी द्यायला सुरवात केली. 

काही मिनिटातच भिगवण चौकापासून ते तीनहत्ती चौकापर्यंत लोकांच्या समुदायाने रस्ता आपोआपच बंद झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी आचारसंहिता असल्याने घोषणाबाजी करु नये, रस्ता मोकळा करावा असे आवाहन केल्या नंतर काही काळ रस्ता मोकळा झाला पण पुन्हा लोकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत घोषणा दिल्या. 

काही काळ कमालीच्या तणावाचे वातावरण होते. युवकांचा उत्साह कमालीचा होता, पवारसाहेबांवर तुम्ही गुन्हे दाखल केले आहेत मग आमच्यावरही गुन्हे दाखल करा, अशी भूमिका घेत रस्त्यावरुन बाजूला होण्यास काही युवकांनी नकार दिला, मात्र नंतर हे युवकही घोषणा देऊन निघून गेले. 
नारायण शिरगावकर व औदुंबर पाटील यांनी वारंवार आवाहन करुन गर्दी नियंत्रित केली व सुमारे अर्ध्या तासानंतर लोक भिगवण चौकातून हळुहळू पांगले. आज लोकांचा उत्साह कमालीचा होता व अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत लोक नव्हते, असे चित्र दिसले. 

बारामती कडकडीत बंद....
दरम्यान आज सकाळपासूनच बारामतीत कडकडीत बंद पाळला गेला. उत्स्फूर्तपणे लोकांनी बंद पाळला. पवार कुटुंबियांवर आकसाने ही कारवाई केली जात असल्याची भावना बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी व्यक्त केली. अत्यावश्यक सेवा सुरळीत होत्या, मात्र शहरातील डॉक्टरांनीही तातडीची सेवा वगळता आज कामकाज बंद ठेवल्याने आज शहरात शुकशुकाट होता. बारामती तालुक्याच्या विविध भागातून लोक शहरात आल्यामुळे आज भिगवण चौकात मोठी गर्दी जमा झाली होती. 

पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली...
आज भिगवण चौकात कमालीचा तणाव निर्माण झाला होता, मात्र नारायण शिरगावकर व औदुंबर पाटील यांनी संयम न सोडता कमालीच्या कौशल्याने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. युवक संतप्त झाले होते, त्या मुळे गर्दीला नियंत्रित करणे पोलिसांनाही अवघड बनत होते, मात्र आवाहन करीत पोलिसांनी लोकांची समजूत काढली. 

माळेगावही बंद -  बारामती येथे  शरद पवार व अजित पवार  यांच्या वरती ईडीचा खोटा ठपका ठेवून पवार साहेबांवर जो षड्यंत्र रचल्याचा प्रकार झाला. त्याचा निषेध करण्यासाठी आज माळेगावकरांना उस्फूर्तपणे माळेगाव बंदची हाक दिली आणि त्याला प्रतिसाद देत माळेगावमधील सर्व प्रकारची दुकाने, उद्योजक, कारखाने, पेट्रोल पंप, मेडिकल दुकाने, कडकडीत बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर परिसरातील सर्व महाविद्यालय, विद्यालय ,शाळा यांना ही सुट्टी देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे निषेध सभेचे आयोजन केले.

या सभेमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश गोपने, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष वाघमोडे ,नितीन तावरे ,प्रशांत मोरे,अविनाश भोसले ,अशोक निवृत्ती तावरे यांनी निषेध केला., दिपक तावरे  नितीन तावरे ,धनंजय जाचक, रोहित शेळके ,अनिल सातपुते,अमित तावरे इरफान तांबोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandh in Baramati for supports to NCP chief Sharad Pawar