बाणेर महाळुंगे रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच 

बाबा तारे 
गुरुवार, 25 जुलै 2019

पुणे : बाणेर महाळुंगे रस्त्यावरील ऑर्चिड शाळेच्या वाहनांमुळे नियमित कोंडी होत असून, इतर नागरिकांची वाहने अनेकदा या कोंडीत अडकतात. वाहनांच्या या गर्दीतून लवकर निघून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट पदपथावरून किंवा वाहनांच्या मधून मार्ग काढत धोकादायक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
सुरक्षित उपाययोजनांसह शालेय वाहनांच्या पार्किंगची सोय शाळेच्या आवारात करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

पुणे : बाणेर महाळुंगे रस्त्यावरील ऑर्चिड शाळेच्या वाहनांमुळे नियमित कोंडी होत असून, इतर नागरिकांची वाहने अनेकदा या कोंडीत अडकतात. वाहनांच्या या गर्दीतून लवकर निघून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट पदपथावरून किंवा वाहनांच्या मधून मार्ग काढत धोकादायक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
सुरक्षित उपाययोजनांसह शालेय वाहनांच्या पार्किंगची सोय शाळेच्या आवारात करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

सकाळी शाळा भरण्याच्या व दुपारी सुटण्याच्या कालावधीत ही कोंडी जास्त प्रमाणात असते. शाळेच्या बस थेट रस्त्यावर उभ्या करून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते, तसेच काही पालक चारचाकीतून पाल्याला घेऊन शाळेत येतात. यामुळे बालेवाडी फाट्याकडून महामार्गाकडे जाताना इतर वाहनांना रस्ता अपुरा पडत असल्याने परिणामी वाहतुकीची कोंडी होते. यामुळे इतर वाहनधारक अक्षरशः त्रस्त होऊन जातात. त्याचबरोबर या मार्गावरून पीएमपी बसेस, बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरवणारी वाहने, टॅंकरसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते आणि या वाहनांना जाण्यासाठी आवश्‍यक असलेला रस्ता कोंडला गेल्याने बालेवाडी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. 

वाहतूक विभागाच्या वतीनेही अनेकदा शाळा प्रशासनाला नोटीसद्वारे कळवूनही यावर काहीच उपाय होत नसल्याने या वाहतूक कोंडी संदर्भात शाळेच्या प्रशासनासमवेत बैठक घेण्यात आली. तसेच शाळेतील वाहनांच्या सुरक्षेसंदर्भातही वाहतूक विभाग, परिवहन विभागाचे अधिकारी, पालक, शिक्षक, बस कंत्राटदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांची सुरक्षा यांवर चर्चा करण्यात आली. 
पालकांनी याची सुरवात स्वतःहून केली, तर वाहतूक कोंडीवर बऱ्याच प्रमाणात आळा बसू शकेल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. एकंदरीतच शाळेच्या वाहनांचा वाहतूक कोंडीवर होणारा परिणाम पाहता शाळेनेच पुढाकार घेऊन आपल्याच आवारातून वाहनांची ने-आण करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, ही मागणी जोर धरत आहे. 

""विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने ही शाळेच्या आवारातच थांबवून वाहतूक करण्यासंदर्भात सूचना शाळेस देण्यात आली आहे. पालकांच्या चारचाकी वाहनांचीही अडचण होत असल्याने त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारल्यास कोंडी होण्याचे टळेल,'' 
- प्रकाश मोरे, सहायक पोलिस निरीक्षक, चतु:शृगी वाहतूक विभाग 

""आमच्या शाळेच्या बस आवारामध्ये घेऊनच विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते; परंतु काही खासगी वाहनांसह पालकांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्याने कोंडी होते. ज्या वाहनांमुळे रस्त्यावर कोंडी होत आहे, अशांचे क्रमांक वाहतूक विभागाला देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळवले आहे. बस शाळेतून बाहेर येताना इतर वाहनांचा अडथळा असल्याने थोडीशी अडचण निर्माण होते, परंतु पूर्णपणे कोंडी आमच्या बसमुळे होत नाही.'' 
- प्रवीण गायकवाड, प्रशासक, वाहतूक व सेवा विभाग, ऑर्चिड स्कूल 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baner-Mahalunge Traffic congestion is regular