बॅंक खात्याची 49 हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जेमतेम दोन दिवस राहिले असतानाही महापालिकेच्या शाळांमधील सुमारे 49 हजार विद्यार्थ्यांचे "डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर' (डीबीटी) योजनेंतर्गत बॅंक खाते काढण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गणवेशासह अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होणार आहे. मात्र, 30 जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे बॅंक खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी मंगळवारी सांगितले.

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशासह विविध शैक्षणिक साहित्याचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येतात. त्यासाठी गेल्या वर्षीपासून "डीबीटी' योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये 84 हजार 433 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 41 हजार 970 विद्यार्थ्यांचे खाते आहे. तसेच, माध्यमिकच्या 12 हजार 800 पैकी सहा हजार विद्यार्थ्यांनी बॅंक खाते उघडले आहे. त्यानुसार गेल्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होणार आहेत. परंतु, जवळपास 49 हजार विद्यार्थ्यांचे खाते नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात अडचणी येणार असल्याचे स्पष्ट आहे.

महापालिकेच्या शाळांमधील एकूण विद्यार्थी 97233
बॅंकेत खाते असलेले विद्यार्थी 47970

Web Title: bank account 49000 student waiting