#CyberSecurity कार्ड क्‍लोनिंगची नको ‘दिवाळी’

पांडुरंग सरोदे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे- कर्वेनगरमधील ५७ वर्षीय मकरंद कुलकर्णी यांचे एका बॅंकेमध्ये बचत खाते आहे. त्याच बॅंकेचे डेबिट कार्ड ते वापरतात. त्यांच्याव्यतिरिक्त संबंधित कार्डचा वापर अन्य कोणीही करत नाहीत. तरीही सप्टेंबर महिन्यात अचानक त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख रुपयांची रक्कम कोणीतरी काढून घेतली. याच पद्धतीने ६ ऑक्‍टोबर रोजी बाणेरमध्ये काही नागरिकांच्या बॅंक खात्यातील पैसे काढले गेले. साहजिकच हे नेमके कसे घडले, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला. हा प्रकार आहे ‘सायबर फ्रॉड’मधील कार्ड क्‍लोनिंगचा ! शहरात गेल्या १० महिन्यांत तब्बल शंभरहून अधिक ‘कार्ड क्‍लोनिंग’च्या घटना घडल्या आहेत.

खरेदी किंवा कोणत्याही कामासाठी आपण एटीएममध्ये जाऊन ठराविक रक्कम काढतो किंवा विविध ठिकाणी आपले डेबिट कार्ड, एटीएम कार्ड स्वाइप करून पैसे देतो. मात्र पैसे काढताना, एखाद्या ठिकाणी खरेदी केल्यानंतर कार्ड स्वाइप करताना आपले डेबिट कार्डचे कोणी क्‍लोनिंग तर करत नाही ना, हे आपण कधीच पाहत नाही. हा प्रकार इथेच थांबत नाही. वैयक्तिक, बॅंकविषयक गोपनीय माहिती चोरूनही या पद्धतीने पैशांची चोरी होत आहे.

एखाद्या दिवशी अचानक आपल्या खात्यातील रक्कम गायब होते. मग नेमके काय आणि कसे घडले, याचा शोध सुरू होते. याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांकडील डेबिट कार्डचे क्‍लोनिंग करून पैसे लंपास करण्याचे प्रकार पुण्यातही घडू लागले आहेत.

‘कार्ड क्‍लोनिंग’ टाळण्यासाठी ही घ्या काळजी
- एटीएम केंद्रात स्कीमर, कॅमेरा, रेकॉर्डर लावला नसल्याची खात्री करा
- एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींना आत येऊ देऊ नका
- पेट्रोल पंप, हॉटेल, मॉल, थिएटरमध्ये कार्डचा वापर करताना काळजी घ्या
- डेबिट कार्ड, बॅंक खात्याची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका
- डेबिट कार्ड वापरताना खबरदारी घेऊन अद्ययावत राहा

गेल्यावर्षी दिवाळीत मी बाणेर परिसरातील एका एटीएम केंद्रामधून आवश्‍यक रोख रक्कम काढली. त्यानंतर घरी गेलो. त्याचदिवशी संध्याकाळी माझ्या खात्यातील १० हजारांची रक्कम अचानक कोणीतरी काढून घेतली होती. घरात डेबिट कार्ड मीच वापरत होतो. त्यामुळे संबंधित रक्कम कोणी काढली?, असा प्रश्‍न होता. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. त्या वेळी हा कार्ड क्‍लोनिंगचा प्रकार असून माझ्याप्रमाणे आणखी शंभरहून अधिक जणांची याच पद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. 
- कौस्तुभ वानखेडे, नोकरदार

कसे केले जाते कार्डचे क्‍लोनिंग
तुम्ही एटीएम सेंटर किंवा कोणत्याही प्रकारची खरेदी करताना स्कॅनरद्वारे तुमचे कार्ड क्‍लोन केले जाते. त्यानंतर सायबर गुन्हेगारांकडून संबंधित कार्डचे बनावट कार्ड बनविले जाते किंवा आपल्या बॅंक खात्यासंबंधीचा डेटा चोरून तो दुसऱ्या कार्डवर कॉपी केला जातो. अशा पद्धतीचे संबंधित कार्डचा वापर करून तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम काही क्षणात काढून घेतली जाऊ शकते.

कार्ड क्‍लोनिंगची ‘दिवाळी’
गेल्या वर्षी ऐन दिवाळीत म्हणजेच ऑक्‍टोबर महिन्यात १३३ जणांचे कार्ड क्‍लोनिंग होऊन त्यांच्या खात्यातील लाखो रुपये काढण्यात आले होते. हिंजवडी, खडकी, कोरेगाव पार्क, बाणेर, रेंजहिल्स परिसरांतील एटीएममधून पैसे काढणाऱ्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम अनोळखी व्यक्तींनी गायब केली होती. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केल्यानंतर ‘सायबर फ्रॉड’मधील ‘कार्ड क्‍लोनिंग’चे प्रकार पुढे आले.

Web Title: bank Card Cloning issue in pune