बॅंकांमध्ये नागरिकांची गर्दी

बॅंकांमध्ये नागरिकांची गर्दी

बहुतांश 'एटीएम' बंदच; मोजक्‍याच ठिकाणी पैसे


पुणे - पाचशे व हजारच्या नोटांचा भरणा करण्यासाठी व त्या बदलून घेण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशीही बॅंकांच्या शाखांबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या, तर बहुतांश "एटीएम' आजही (ता. 12) बंदच राहिले आणि काही मोजक्‍या एटीएम केंद्रांवरच पैसे काढता येत होते. तिथेसुद्धा नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र शनिवारी शहरात पाहायला मिळाले.

नागरिकांची गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी महिन्यातला दुसरा शनिवार असूनही बॅंकांचे कामकाज आज सुरू ठेवण्यात आले होते. सर्वसामान्यांसाठी सुटीचा दिवस असल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच बॅंकांकडे नागरिकांनी धाव घेतली. केवळ बॅंकाच नव्हे, तर पोस्ट ऑफिसमध्येही रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते. बॅंका व पोस्टाबाहेर असलेल्या रांगांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते.

बॅंकांमध्ये रांगा लावलेल्या लोकांना चांगले-वाईट अनुभव शनिवारीसुद्धा आले. काही बॅंकांमध्ये कर्मचाऱ्यांकडून चांगली, तर काही ठिकाणी वाईट वागणूक देण्यात आल्याचे नागरिकांनी "सकाळ'ला सांगितले. काही बॅंकांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच, नोटा भरण्यासाठी आलेल्यांसाठी आणि पैसे काढण्यासाठी आलेल्यांसाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. मात्र, बऱ्याच बॅंकांमध्ये ठराविक संख्येत लोकांना प्रवेशद्वारातून आत घेतल्यानंतर जाळीचे दार लावून घेतले जात असल्याचे पाहायला मिळाले. दाराबाहेर असलेल्या रांगांमधील नागरिक शांततेत उभे होते.

संक्रमणकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी काही नगरसेवकांनीही पुढाकार घेतल्याचे दिसले. सिंहगड रस्त्याच्या परिसरातील महाराष्ट्र बॅंक, एचडीएफसी, टीजेएसबी आणि जनता बॅंकेच्या बाहेर उभे असलेल्या नागरिकांसाठी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्यावतीने पिण्याच्या पाण्याची आणि चहाची व्यवस्था करण्यात आली. बॅंकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून नागरिकांसाठी शाखेबाहेर मदतीसाठी "टेबल' सुरू करण्याची तयारी दर्शविण्यात आली होती; मात्र बॅंकेकडून त्याला नकार देण्यात आला, अशी माहिती नागपुरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

एटीएम केंद्र शनिवारीसुद्धा "साफ'
नवीन नोटांच्या आकाराप्रमाणे "रिकॅलिब्रेशन' करण्याच्या कारणास्तव देशभरातील एटीएम केंद्रांतील यंत्रं बंद असल्यामुळे शहरातील सर्व बॅंकांची बहुतांश एटीएम केंद्रे शुक्रवारप्रमाणेच शनिवारीसुद्धा एकदम "साफ' दिसत होती. एरवी "ट्रान्सॅक्‍शन स्लीप'चा ढीग पडलेला दिसणाऱ्या केंद्रांमध्ये स्वच्छता होती. एटीएम केंद्रातून पैसे निघत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी नागरिकांची लगबगसुद्धा पाहायला मिळत होती; परंतु पैसे निघत नसल्याने हताश होऊन तसेच हसत-हसत बाहेर पडणारे नागरिकही दिसत होते. केंद्रातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीलाच "आहेत का' एवढाच प्रश्‍न दुचाकीवर बसून विचारणारे आणि "नाही' असे हसत-हसत उत्तर देणाऱ्या व्यक्तींमधील संभाषण सर्वत्र एकसारखेच होते.

ज्या एटीएम केंद्रांमधून पैसे काढता येत होते, त्या रांगेतील नागरिकांमध्येही चलन बदलाच्या विषयाचीच चर्चा ऐकायला मिळत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत प्रत्येक नागरिकाकडून होत होते. एटीएम केंद्रांवरील गैरसोय टाळता आली असती का, या प्रश्‍नावर मात्र रांगेतील प्रत्येक "अर्थतज्ज्ञ' स्वतःचे मत आग्रहाने मांडत होता.

मार्केट यार्ड परिसरातील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेत दुपारी गेलो तेव्हा गर्दी नव्हती, त्यामुळे नोटा भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. मात्र, शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे पैसे काढण्यासाठी बॅंकेत पुन्हा जावे लागणार आहे.
- कल्याण भालेराव, नागरिक

बॅंकांमध्ये फक्त नोटांचा भरणा आणि शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवून एटीएम केंद्रांमध्ये परिपूर्ण व्यवस्था केली गेली पाहिजे होती. असे केले असते, तर बॅंकांमधील गर्दी निम्म्याने टळली असती आणि लोकांची गैरसोयसुद्धा झाली नसती. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांवरही ताण आला नसता. खरं म्हणजे लोकांनीसुद्धा खूप घाई नाही केली पाहिजे. वृद्धांना आणि दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले पाहिजे.
- दिलीप कदम, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com