बॅंकेतील गर्दीला शनिवारचा अपवाद; थेट काउंटरवर पैसे

संदीप घिसे
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

पिंपरी - बॅंकेत फक्‍त ज्येष्ठ नागरिकांना आणि खातेदारांनाच नोटा बदलून मिळणार असल्याचे शुक्रवारी सरकारने जाहीर केले होते, त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत गर्दीला शनिवार (ता. 19) अपवाद ठरला. बॅंकेतील थेट काउंटरवर जाऊन पैसे मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळाले.

पिंपरी - बॅंकेत फक्‍त ज्येष्ठ नागरिकांना आणि खातेदारांनाच नोटा बदलून मिळणार असल्याचे शुक्रवारी सरकारने जाहीर केले होते, त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत गर्दीला शनिवार (ता. 19) अपवाद ठरला. बॅंकेतील थेट काउंटरवर जाऊन पैसे मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ ऑक्‍टोबरला पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली, त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांची बॅंकांमध्ये गर्दी होत आहे. बॅंकेत खाते नसले तरी नागरिकांकडून फॉर्म व ओळखपत्राची झेरॉक्‍स घेऊन साडेचार हजार रुपयांपर्यंत नोटा बदली करून दिल्या जात होत्या. त्यामुळे शुक्रवारपर्यंत (ता. 18) बहुतांश बॅंकांमध्ये गर्दी दिसत होती. काही बॅंकांनी नोटा बदली करून घेण्यासाठी जादा काउंटरची व्यवस्थाही केली होती. मात्र, रांगेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी फक्‍त ज्येष्ठ नागरिक व खातेदारांनाच नोटा बदलून दिल्या जातील, असे बॅंकांनी जाहीर केले होते. त्यामुळे इतर नागरिक नोटा बदली करून घेण्यासाठी आलेच नाहीत. परिणामी बॅंकांमध्ये फारशी गर्दी दिसली नाही. सकाळी अगदी थोडी रांग होती. मात्र, दुपारनंतर थेट काउंटरवर जाऊन पैसे घेता येत होते. रांग असलेल्या बॅंकांमध्येही अगदी अर्धा-पाऊण तासात पैसे मिळत होते.

ज्येष्ठ नागरिकांची अडचण
निवृत्तिवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून एकदा जिवंत असल्याचा दाखला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बॅंकेत द्यावा लागतो. त्यानुसार अनेक ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी शनिवारी रांगेतून काउंटरपर्यंत गेल्यावर त्यांना "जिवंत'पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगितली जात होती, त्यामुळे काही ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांना केवायसी आवश्‍यक
अनेक ग्राहकांनी आपले खाते सहा महिन्यांपूर्वीपासून वापरले नव्हते, यामुळे त्यांना आपल्या खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी "केवायसी' आवश्‍यक होते. त्यांचीही चिडचिड होताना दिसून आली. अनेक ग्राहकांनी आपले पॅनकार्ड खात्याशी जोडलेले नव्हते. यामुळे त्यांना खात्यात 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम भरता येत नव्हती.

शहरातील एटीएम बंद
दोन दिवसांपूर्वी शहरातील काही एटीएम सुरू झाले होते. मात्र, शनिवारी पुन्हा ती बंद असल्याचे दिसून आले. ज्या नागरिकांना पैशांची गरज आहे ते विविध ठिकाणी जाऊन कुठे एटीएम सुरू आहे का, याबाबत चाचपणी करीत होते. पाचशे रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध झाल्यानंतरच गर्दीला आळा बसेल, असे मत काही बॅंक अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले.

पेट्रोलपंप, मॉलमध्ये रोकड नाहीच
देशातील काही भागांमध्ये पेट्रोलपंप, मॉल व मोठमोठ्या दुकानांमधून क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या आधारे पैसे मिळणार, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, शहरातील एकाही ठिकाणी ही व्यवस्था उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

कर्मचारी एसीत, नागरिक उन्हात
काही बॅंकांमध्ये कार्यालयात गर्दी नको म्हणून केवळ चारच खातेदारांना पैसे बदलण्यासाठी आत सोडले जात होते. इतर नागरिकांना बॅंकेच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागत होते. यामुळे उन्हात घामाघूम होऊन बॅंकेत गेलेल्या नागरिकांना एसीमुळे हायसे वाटत होते.

दलालांना बसला आळा
बॅंकेत नोटा बदली करून घेताना आधार कार्डची नोंद केली जात होती. ज्याने पूर्वी नोटा बदलून घेतल्या आहेत, ते परत नोटा बदली करून घेण्यासाठी आल्यास यंत्रणेतून आधारकार्डाचा नंबर व कधी नोटा बदली करून घेतल्या याबाबत माहिती उपलब्ध होत आहे. यामुळे नोटा बदली करून घेणाऱ्या दलालांना आळा बसल्याचे बॅंक ऑफ इंडियाच्या पिंपरी शाखेचे व्यवस्थापक एम. डी. कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Bank crowd Saturday exceptions; Directly counter money