संचालकांच्या निर्णयाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार गुप्ता यांचे अधिकार बॅंकेच्या संचालक मंडळाने काढून घेतले आहे. या निर्णयाच्या विरोधात बॅंकेचे अधिकारी आणि सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

बॅंकेच्या ‘लोकमंगल’ मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात  शनिवारी हे आंदोलन करण्यात आले. संचालकांचे अधिकार संचालक मंडळाने काढणे, हे नियमबाह्य आहे. केंद्र व राज्य सरकार, तसेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक बॅंकेवर कारवाई करत आहेत. पोलिसांची ही कारवाई संशयास्पद आहे, असा आरोप ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र फेडरेशनतर्फे धनंजय कुलकर्णी यांनी केला.

महाराष्ट्र बॅंकेला विश्‍वसनीय बॅंक म्हणून गेल्या महिन्यात गौरविण्यात आले होते. बॅंकेचे हे यश पाहवत नसल्याने असे बदनामीचे प्रकार सुरू आहेत. त्याच्या निषेधार्थ आणि जोपर्यंत ही कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत कर्मचारी काळी फीत लावून काम करतील, असे बॅंक ऑफ महाराष्ट्र युनियनचे महासचिव शैलेश टिळेकर यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बॅंकेचे कार्यकारी संचालक व सध्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार असलेले ए. सी. राऊत यांची भेट घेऊन आपली भूमिका विशद केली व सद्य:स्थितीत सर्व संघटना व्यवस्थापनाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याची ग्वाही दिली.

युनायटेड फोरमच्या सभेचे आयोजन 
बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर करून संचालक मंडळाने आणि वित्त मंत्रालयातील बॅंकिंग विभागाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. ती मान्य न केल्यास आंदोलनाचे पुढील स्वरूप ठरविण्यासाठी युनायटेड फोरमची सभा ६ जुलै रोजी लोकमंगल शाखेमध्ये होणार आहे. त्याच दिवशी पुण्यातील कर्मचाऱ्यांची सभा आयोजित  होणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Web Title: bank of maharashtra director employee protest