बॅंकांत पैसे नसल्याने पेन्शनधारकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे -  नोकरदारांना पगार किंवा पेन्शन काढता यावी, यासाठी रिझर्व्ह बॅंकेने काही बॅंकांना गुरुवारी अधिक रक्कम उपलब्ध करून दिली; परंतु बॅंकांना ती कमी जास्त स्वरूपात उपलब्ध झाल्याने काही बॅंकांमध्ये दहा ते बारा हजार रूपये, तर काही बॅंकांमध्ये दोन ते पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दिवसभर रांगेत थांबूनही पुरेसे पैसे न मिळाल्याने पेन्शनधारकांचे हाल झाले.

पुणे -  नोकरदारांना पगार किंवा पेन्शन काढता यावी, यासाठी रिझर्व्ह बॅंकेने काही बॅंकांना गुरुवारी अधिक रक्कम उपलब्ध करून दिली; परंतु बॅंकांना ती कमी जास्त स्वरूपात उपलब्ध झाल्याने काही बॅंकांमध्ये दहा ते बारा हजार रूपये, तर काही बॅंकांमध्ये दोन ते पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दिवसभर रांगेत थांबूनही पुरेसे पैसे न मिळाल्याने पेन्शनधारकांचे हाल झाले.

डिसेंबर महिन्याचा आज पहिलाच दिवस. त्यामुळे पगार किंवा पेन्शनची रक्कम मिळेल, या आशेने आज सकाळपासूनच बॅंकांमध्ये मोठ्या रांगा लागल्या होत्या. पेन्शन राष्ट्रीयीकृत बॅंकेत मिळत असल्याने विशेषतः त्या बॅंकांमध्ये मोठी गर्दी होती. बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या काही शाखांना पुरेशी रोकड मिळाल्याने तिथे खातेदारांना सात ते बारा हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली, तर अन्य शाखांमध्ये अडीच ते सात हजार रुपयांदरम्यान रक्कम दिली गेली, तर काही बॅंकांमध्ये दोन ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली.

अनेक खासगी बॅंकांमधील रोख रक्कम दुपारीच संपुष्टात आल्याने खातेदार हवालदिल झाले होते. बॅंक ऑफ इंडियाच्या अनेक शाखांमध्ये खातेदारांना पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. बॅंक ऑफ बडोदामध्ये खातेदारांना पाच ते सात हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली. भांडारकर रोड, आपटे रोड, शिवाजीनगर, कोथरूड, बाणेर, कात्रज भागातील खासगी बॅंकांमध्ये रोकड कमी असल्याने या बॅंकांना रेशनिंग करावे लागले. काही बॅंकांमध्ये करंट खातेदारांना पन्नास हजार रुपये देण्यात आले. बचत खातेदारांना दोन ते सात हजारांपर्यंत रक्कम दिली गेली; मात्र बहुतांश खासगी बॅंकांमध्ये दुपारी बाराच्या आसपासच रोख रक्कम संपुष्टात आली. त्यामुळे सकाळपासून रांगेत थांबूनही आणि पुरेसे पैसे न मिळाल्याने अनेकांना निराश होऊन परत जावे लागले. काही शाखांमध्ये उशिरापर्यंत तशीच गर्दी कायम असल्याचे चित्र होते. शहरातील काही भागातील एटीएम सकाळी सुरू होती. दुपार आणि सायंकाळनंतर काही एटीएम सुरू होती. त्यामुळे एटीएमबाहेर रांगा लावलेल्या अनेकांच्या पदरी निराशा पडली.

नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती
अपेक्षित रक्कम मिळत नसल्यामुळे अनेक बॅंकांच्या शाखेत पेन्शनरांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. पुरेसा निधी न मिळाल्यामुळेच पैशांचे वाटप करण्यात अडचणी येत असल्याचे बॅंक कर्मचाऱ्यांकडून खातेदारांना सांगण्यात येत होते. अनेक बॅंकांनी एसएमएस पाठवून नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली.

Web Title: bank pension holders