बॅंका आजपासून रविवारपर्यंत चालू राहणार 

bank
bank

पुणे - काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सध्याच्या चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा काल मध्यरात्रीपासून अचानक रद्द करण्यात आल्यानंतर नागरिकांची अधिक काळ गैरसोय होऊ नये, म्हणून बॅंकांच्या सर्व शाखा उद्यापासून (गुरुवार) रविवारपर्यंत सलग चालू ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याकडील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा उद्यापासूनच सुरळीतपणे बदलून घेता येणार आहेत, तसेच आपल्या बॅंक खात्यात भरताही येऊ शकणार आहेत. हे पाहता नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बॅंकांकडून करण्यात आले आहे. 

चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत बदलून घेता येणार आहेत. त्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी आज बॅंका बंद ठेवण्यात आल्या होत्या. सर्व बॅंकांमध्ये नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जात आहेत, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टाळता येणार आहे. यासंदर्भात बॅंका, तसेच टपाल कार्यालयांना आवश्‍यक ती व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्जही तयार ठेवले जाणार आहेत. 

बॅंकांत उशिरापर्यंत कामकाज 

स्टेट बॅंकेसह काही बॅंकांनी उद्या सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज करणार असल्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बॅंकेने नागरिकांच्या सोयीसाठी येत्या शनिवारी व रविवारी बॅंका पूर्णवेळ चालू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे याही दिवशी नागरिकांना व्यवहार करता येणार आहेत. 

नव्या स्वरूपातील नोटा पुरेशा प्रमाणात सर्व बॅंकांमध्ये उपलब्ध होईपर्यंत काही दिवस बॅंकेतून पैसे काढण्यावर मर्यादा येणार आहेत. जास्तीत जास्त 4 हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. बॅंकेतून एका दिवशी कमाल 10 हजार काढता येणार आहेत. देशभरातील एटीएम केंद्रे 11 नोव्हेंबरपासून कार्यरत होणार असून, दरदिवशी प्रतिकार्ड 2 हजार काढता येणार आहेत. दर आठवड्याला असलेल्या 20 हजारांच्या मर्यादेत हे व्यवहार गृहित धरले जाणार आहेत. 

नोटा बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष 

जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी उद्यापासूनच बॅंकांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन केले जाणार आहेत. तेथे विहित नमुन्यातील अर्ज आणि ओळखपत्र सादर करून नोटा बदलून घेता येणार आहेत. अर्थात ग्राहकांच्या बॅंक खात्यात जर या नोटा जमा करायच्या असतील, तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नोटा 30 डिसेंबरपर्यंत खात्यात भरता येणार आहेत. सध्या बॅंकांच्या शाखांमध्ये आणि एटीएम केंद्रांमध्ये 100 च्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही स्थितीत घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्टेट बॅंकेने म्हटले आहे. 

रोख व्यवहारांना पर्याय म्हणून नागरिकांनी डेबिट व क्रेडिट कार्ड, मोबाइल बॅंकिंग आणि इंटरनेट बॅंकिंग या सुरक्षित सोयी-सुविधांचा वापर करावा, अशी आवाहनवजा विनंतीही बॅंकांकडून करण्यात आली आहे. 

कॉसमॉस बॅंक करन्सी चेस्ट सज्ज 

कॉसमॉस को-ऑप. बॅंकेची स्वतःची "करन्सी चेस्ट' असून, तेथे 2 हजारांच्या नव्या नोटा आणि 100 च्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणीही नागरिकांना सहज आणि सुरळीतपणे नोटांचा पुरवठा करता येऊ शकणार आहे, असे या बॅंकेने कळविले आहे. बॅंकेच्या शाखांमध्ये नोटा बदलून देण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com