बॅंकांनी लोकांची काळजी घ्यावी : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीतील ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स या बॅंकेमध्ये जाऊन नोटांसंदर्भातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. "लोकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी बॅंकेकडून घेतली जावी,' अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीतील ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स या बॅंकेमध्ये जाऊन नोटांसंदर्भातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. "लोकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी बॅंकेकडून घेतली जावी,' अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

बारामतीच्या बॅंकेमध्ये लोकांना किती पैसे दिले जातात, नोटांची परिस्थिती काय आहे, पाचशेच्या नोटा उपलब्ध होतात का, लोकांच्या भावना काय आहेत, याबाबत शरद पवार यांनी या वेळेस माहिती घेतली. बॅंकेचे व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी यांनी त्यांना सद्यःस्थितीबाबत माहिती दिली. त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव व आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे होते. दोन हजारांच्या नोटेचा रंग जातो, याबाबत विचारणा करत पवार यांनी स्वतःच्या खिशातील दोन हजारांची नवीन नोट काढली व सोबत असलेल्या माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्याकडील पांढऱ्या रुमालाला नोट घासली असता नोटेचा रंग रुमालाला लागला.

बारामतीच्या बॅंकेमध्ये उपलब्ध रोख रक्कम जशी असेल, त्याप्रमाणे आम्ही लोकांना पैसे देत असतो, सर्व लोकांना काही प्रमाणात रोकड मिळेल, याची काळजी घेत असल्याचे कुलकर्णी यांनी पवार यांना सांगितले. दरम्यान, बॅंकेच्याच एका खातेदाराने पाचशे रुपयांची नवीन नोट पवार यांना दाखविली. त्यावेळेस पाचशेच्या दोन वेगळ्या नोटांची छपाई कशी झाली, याची प्रतच पवार यांनी या वेळी दाखविली. बारामतीतील बॅंकांत अद्यापही पाचशेची नवीन नोट मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेत येण्यापूर्वी बॅंकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या बारामतीकरांशीही पवार यांनी संवाद साधला. नागरिकांनीही त्यांना एटीएममधून दोनच हजार मिळतात, तेही खूप प्रयत्न करून, वेळ घालवून रांगेत उभे राहून मिळवावे लागतात, अशी व्यथा त्यांच्यासमोर व्यक्त केली.
"लोकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी बॅंकेकडून घेतली जावी,' अशी अपेक्षा पवार यांनी या वेळी कुलकर्णी यांच्याकडे व्यक्त केली.

पवार यांनाही पैसे मिळाले नाहीत
शरद पवार म्हणाले, "दिल्लीतील संसद भवन परिसरातील एका बॅंकेतून 25 हजार रुपये काढण्यासाठी आपण धनादेश पाठविला; पण संबंधित बॅंकेने दहा हजार रुपये देऊ केले,'' हा किस्सा सांगून ते म्हणाले, ""बारामतीकरांची नोटाबंदीच्या निर्णयानंतर काय अवस्था आहे, याबाबत मला काळजी होती, त्यामुळे आज स्वतः बॅंकेत जाऊन परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.''

Web Title: banks shall take care of people, expects sharad pawar