वचननाम्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा - बापट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - ""महापालिका निवडणुकीत भाजपने पुणेकरांना दिलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षातर्फे स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करून त्याची पूर्तता करण्यात येईल. तसेच नागरिकांचे प्रश्‍न वेगाने सोडविण्यासाठी पक्षाने नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार केली आहे,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी बोलताना दिली. 

पुणे - ""महापालिका निवडणुकीत भाजपने पुणेकरांना दिलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षातर्फे स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करून त्याची पूर्तता करण्यात येईल. तसेच नागरिकांचे प्रश्‍न वेगाने सोडविण्यासाठी पक्षाने नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार केली आहे,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी बोलताना दिली. 

पक्षाच्या मुक्ता टिळक आणि रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ कांबळे यांनी अनुक्रमे महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरल्यावर बापट बोलत होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, ""महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपवर पुरेपूर विश्‍वास टाकला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी पक्षाने तयार केलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्यावर पक्ष भर देईल. त्यासाठी नगरसेवक आणि पदाधिकारीही काम करतील; परंतु त्याशिवाय शहराध्यक्ष गोगावले यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार केली आहे. ती पूरक पद्धतीने काम करेल. महापालिकेतील कारभार पारदर्शकपणे होण्यावर पक्षाचा भर असेल.'' 

नागरिकांची दैनंदिन कामे आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी वेगाने होण्यासाठी नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. त्यांनी संपर्क कार्यालय प्रभागात स्थापन करावे, प्रभागात नागरिकांना उपलब्ध व्हावे, सातत्याने मतदारांशी संपर्क करावा, इत्यादी मुद्दांचा या आचारसंहितेमध्ये समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महापालिकेत भाजपला यापूर्वी अनेक पदे मिळाली; परंतु महापौरपद पहिल्यांदाच मिळाले आहे. पक्षाचे संख्याबळ पाहता निवडणुकीच्या दिवशी महापौर, उपमहापौर सहज निवडून येतीलच, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांसाठी आखलेल्या योजनांची माहिती आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

शिवसेनेबाबत "वेट अँड वॉच' 
मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरांना मतदान केले आहे; मात्र पुण्यामध्ये शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिला, याबाबत विचारणा केली असता, महापौरपदाची निवडणूक 15 मार्च रोजी आहे. त्या दिवसापर्यंत बघा काय होते ते, असे बापट यांनी सांगितले. मुंबईच्या धर्तीवर पुण्यात उपलोकायुक्त नियुक्त करणार का, असे विचारले असता. उपलोकायुक्तांचे पुण्यावर लक्ष असतेच; परंतु गरज भासली तर राज्य सरकार पुण्यातही उपलोकायुक्त नियुक्त करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Bapat was speaking on Wednesday picked up nominations