Ajit pawar : अजित पवारांच्या कानपिचक्यांनंतर एक्साईज व पोलिस विभाग हलला baramati ajit pawar warning excise and police department crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit pawar : अजित पवारांच्या कानपिचक्यांनंतर एक्साईज व पोलिस विभाग हलला

बारामती - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरु असलेल्या अवैध दारुविक्रीबाबत जाहिरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुनिर्मिती व विक्री करणा-यांविरुध्द कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. खास आपल्या शैलीत अजित पवारांनी पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई सत्रास प्रारंभ केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक तानाजी शिंदे, आर.डी.भोसले, बी.बी. नेवसे, राजेंद्र झोळ, संजय दिंडे, वर्षा घोडे, गणेश नागरगोजे, यांच्यासह पथकातील इतर कर्मचा-यांच्या मदतीने छापासत्र केले.

माळेगाव, लकडेवस्ती, सांगवी, पाहुणेवाडी, मेखळी, सोनगाव परिसरातील अवैध दारुविक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली गेली. या प्रकरणी दहा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सहा जणांना अटक केली आहे तर तीन आरोपींचा शोध सुरु आहे. या कारवाईत जवळपास सव्वा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास निरिक्षक तानाजी शिंदे करीत आहेत.

दरम्यान पोलिस विभागाच्या वतीने बारामती उपविभागात एप्रिल अखेरपर्यंत बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण व माळेगाव या पोलिस ठाण्याअंतर्गत दारुबंदीचे 225 गुन्हे दाखल झालेले असून यात 245 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे, यात जवळपास साडेसात लाखांचा मुदेदमाल जप्त करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली.

नियमित कारवाईसाठी पथकांची गरज...

अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नियमित तपासणी, गस्त, अचानक धाडी घालणे या उपायांनंतरच हे अवैध व्यवसाय बंद होऊ शकतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.