पावसाचा टिपूसही नसताना इंदापूर तालुक्यात नदीला पूर 

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या एक लाख क्‍युसेकपर्यंतच्या पाण्याने इंदापूर व बारामती तालुक्‍यातील सर्वच बंधारे आपल्या पंखाखाली घेतले आहेत. त्यामुळे फलटण, माळशिरस तालुक्‍याचा व इंदापूर, बारामतीचा संपर्क तुटला आहे.

भवानीनगर (पुणे) : वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या एक लाख क्‍युसेकपर्यंतच्या पाण्याने इंदापूर व बारामती तालुक्‍यातील सर्वच बंधारे आपल्या पंखाखाली घेतले आहेत. त्यामुळे फलटण, माळशिरस तालुक्‍याचा व इंदापूर, बारामतीचा संपर्क तुटला आहे.

""बारा वर्षापूर्वी एकदा असा पूर आला, पण तेव्हा पाऊस तरी पडला होता...आता तर पावसाचा टिपूस नाही, पण महापूराने रस्ते बंद पडले आणि नदीने आक्राळविक्राळ रूप घेतले आहे, हे मात्र आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. नदीची आम्हाला पहिल्यांदा भीती वाटू लागली आहे...'' अशा शब्दांत कुरवलीचे सुभाष पांढरे नीरा नदीला आलेल्या पुराबाबत सांगत होते. 

दोन दिवसांपासून नीरा नरसिंहपूर ते बारामती या रस्त्यावरील तावशी, उद्धट, कुरवली, चिखली या रस्त्यांवर नदीचे पाणी घुसले आहे. येथील ओढ्यांना विनापावसाचाच महापूर आला आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. 

तावशी येथे छत्रपती कारखान्याचे संचालक रसिक सरक, जिल्हा बॅंकेचे अधिकारी व्ही. एस. शिंदे, ललित देवकाते यांनी पहिल्यांदाच असा पूर पाहत असल्याचे सांगितले. यापूर्वी नदीला पूर आला होता, तेव्हा बारामती- बावडा रस्ता पाण्याखाली गेला होता, मात्र तेव्हाही नदीच्या पाण्याला एवढा वेग नव्हता, असे हे सारे सांगत होते. सन 2005 नंतर ही स्थिती पाहत असून, आता गुडघाभर पाण्यातही उतरण्याचे धाडस करू वाटत नाही, असे उद्धट येथील शेतकरी सांगत होते. 

पूर पाहण्यासाठी गर्दी 
इंदापूर तालुक्‍यात गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच नदीला महापूर आल्याने आसपासच्या गावातील शेतकरी व नागरिक हा पूर पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, कामगार नेते युवराज रणवरे, कामगार सोसायटीचे अध्यक्ष संजय मुळीक यांनी कुरवली, तावशी येथे भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली. नदीकाठच्या अर्धा किलोमीटर भागातील पिके पाण्याखाली गेली असून, नदीच्या पाण्याचा फुगवटा उलटीकडे वाहत येऊन ओढ्यांमध्ये घुसल्याने पाऊस नसताना गावातही पुराचा अनुभव लोक घेत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati and Indapur taluka, the river flooded when there was no rainfall