बारामतीमध्ये कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राज्य सहकारी बॅंकेतील अनियमितताप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याचे पवार यांच्या होम पिचवर म्हणजेच पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) तीव्र पडसाद उमटले.

पुणे - राज्य सहकारी बॅंकेतील अनियमितताप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याचे पवार यांच्या होम पिचवर म्हणजेच पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) तीव्र पडसाद उमटले. बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून बारामती येथील भाजप कार्यालयासमोर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुणे जिल्ह्यातील दौंड, आंबेगाव, इंदापूर, भोर तालुक्‍यांत निदर्शने, धरणे आंदोलन करत सरकार आणि ईडीचा निषेध करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी (ता. २६) पुरंदर आणि इंदापूर तालुक्‍यातील भिगवण येथे बंद पुकारण्यात आला आहे. 

शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बॅंकेच्या ७१ संचालक मंडळावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याबाबतच्या बातम्या झळकताच मंगळवारपासून त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरवात झाली होती. त्याचेच रुपांतर बुधवारी बंद, निषेध सभा, निदर्शने आंदोलनात झाले. दौंड तालुक्‍यातील  चौफुला येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. 

मुळशी तालुक्‍यातील घोटावडे फाटा, बारामती तालुक्‍यातील माळेगाव, पणदरे, करंजेपूल, डोर्लेवाडी बारामती  शहरातील भिगवण चौक, इंदापूर शहर आणि मंचर (ता. आंबेगाव) येथे आंदोलन आणि निषेध सभा घेण्यात आल्या. भोरमध्ये अस्मिता आंदोलनाचे आयोजन करण्यात  आले होते.

शिरूरमध्ये अनेक ठिकाणी ‘बंद’
शिरूर - शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला; तर काही गावांत तरुणांनी संघटित होऊन शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. इनामगाव, मांडवगण फराटा, निर्वी, तांदळी, सादलगाव या गावांतून व वाड्यावस्त्यांतून तरुण रस्त्यावर आले. माजी आमदार ॲड. अशोक पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप मोकाशी, माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, संचालक शंकर फराटे, कांतिलाल होळकर, शरद चकोर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक गावांच्या चौकांत काळे झेंडे फडकावून तरुणांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati band