बारामती भिगवण रस्ता होणार सिमेंट कॉंक्रीटचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road Development

बारामतीहून सोलापूर किंवा पुण्याच्या दिशेने जाणे अधिक सुखकर व जलद होईल.

Baramati Bhigwan Road : बारामती भिगवण रस्ता होणार सिमेंट कॉंक्रीटचा

बारामती : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा बारामती भिगवण हा रस्ता आता सिमेंट कॉंक्रीटचा होणार आहे. या मुळे बारामतीहून सोलापूर किंवा पुण्याच्या दिशेने जाणे अधिक सुखकर व जलद होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून बारामती भिगवण रस्ता नीट करण्याची मागणी होत होती. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने बारामती एमआयडीसी ते खानोटा पूलापर्यंतचा 28 कि.मी. लांबीचा हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुर्वे यांनी दिली.

शहरातील डायनामिक्स डेअरीपासून ते खानोटापुला पर्यंत तीन पदरी दहा मीटरचा रस्ता केला जाणार आहे. दोन्ही बाजूला एक मीटर साईडपट्टी केली जाणार आहे. या संपूर्ण कामासाठी 180 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. व्ही.एच. खत्री यांच्याकडे या रस्त्याच्या उभारणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान बारामती भिगवण दरम्यान मदनवाडी येथील पूल देखील पाडून नवीन पूल उभारण्यात येणार आहे. हे अवघड वळण काढून हा रस्ता सरळ करण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी साडेआठ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. बारामती शेटफळगडे हा टप्पा सुरवातीला हातात घेण्यात आला असून एका बाजूने काम सुरु ठेवून दुसरी बाजू वाहतूकीसाठी खुली ठेवण्यात येणार आहे.