स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच      

मिलिंद संगई
रविवार, 9 डिसेंबर 2018

बारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात नसल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच असल्याचे चित्र आहे. 
 

बारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात नसल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच असल्याचे चित्र आहे. 

गेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत बारामती नगरपालिकेचे तीन तेरा वाजल्यानंतर नगरपालिकेच्या प्रशासनाला कमालीच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या नंतर नगरपालिकेने तयारी सुरु केली असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शहराच्या अनेक भागात रस्त्यांवर कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून येतो. अनेकदा नागरिक पत्रकारांना या कचऱ्याच्या ढिगांचे फोटो पाठवून या बाबत काहीतरी करा ,असे आवाहन करीत असतात. 

नगरपालिकेने एकीकडे स्वच्छता व कचरा उचलण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केलेली असली तरी शहरात आजही अनेक ठिकाणे अशी आहेत की जेथे कचरा टाकला जातो व त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. कचराकुंडी मुक्त बारामतीची संकल्पना प्रत्यक्षात आली, घंटागाड्याद्वारे बारामतीत कचऱ्याचे संकलन सुरु झालेले असले तरी सातत्याने कचरा टाकण्याची काही ठिकाणे ठरुन गेली असून त्या बाबत नगरपालिकेने पावले उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे. 

कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणारे ठराविक लोकच असून त्यांच्याविरुध्द नगरपालिकेने कारवाईची मोहिम सुरु करावी, अशीही मागणी होत आहे. दुसरीकडे हद्दवाढीनंतर शहराची वाढलेली लोकसंख्या व विस्तार यांचा विचार करता अधिक संख्येने स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यासह यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याशिवाय नगरपालिकेला गत्यंतर नसल्याचेही नागरिक बोलून दाखवित आहेत. अस्वच्छता करणा-यांविरुध्द दंडात्मक कारवाईचे अधिकार नगरपालिकांना राज्य शासनाने देऊनही बारामती नगरपालिकेने अद्यापपर्यंत एकाही जणाविरुध्द दंडात्मक कारवाई केली नाही. 

मोकळे प्लॉट अस्वच्छतेचे उगमस्थान
शहरातील मोकळे प्लॉट अस्वच्छतेचे उगमस्थान बनत चालली असून अशा प्लॉटधारकांना नगरपालिकेने नोटीस देऊन संबंधित प्लॉट स्वच्छ राहतील याचे निर्देश देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

उपाययोजना अधिक प्रभावी करणार
स्वच्छतेबाबत नगरपालिका अहोरात्र काम करत आहे, तरीही नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. या बाबत प्राप्त सूचनांनुसार काही बदल करुन शहर अधिक स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न असेल
- योगेश कडुसकर, मुख्याधिकारी, बा.न.प.

 

Web Title: Baramati citizens was still unsatisfied with cleanliness