बारामतीत आज ‘बंद’ची हाक

Ganpati-Damage
Ganpati-Damage

बारामती शहर - गणेश मूर्ती विटंबना झाल्याचा आरोप करत बारामतीतील गणेश मंडळांच्या वतीने बुधवारी (ता. ३) ‘बारामती बंद’ची हाक देण्यात आली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, एन्व्हॉयर्न्मेंटल फोरमचे पदाधिकारी यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मूर्ती विसर्जन केले जाणार नाही, असा इशारा प्रशांत सातव यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

प्रशांत सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपालिकेने गोळा केलेल्या सर्व मूर्ती पोलिसांनी ताब्यात घ्याव्यात, मुख्याधिकारी योगेश कडुसकर व आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांना अटक करून त्यांचे निलंबन करावे, अटकेची कारवाई होत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करू नये, हा सर्व दुर्दैवी प्रकार घडला आहे, त्याची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षा व फोरमच्या अध्यक्षांनी लेखी माफी मागावी, अशी मागणी केली. प्रशांत सातव यांच्यासह नगरसेवक सुनील सस्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 

लेखी खुलाशाचे नगराध्यक्षांचे आदेश
बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनीही कार्यालयीन प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी या सर्व घटनेचा सविस्तर लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबतच्या पत्रात नमूद केले आहे की, याबाबत चुकीचे काम केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असा प्रकार झाला असल्यास माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. हा प्रकार चुकीचाच आहे.

पर्यावरणरक्षणासाठी मूर्ती कालव्यात विसर्जित न करता कृत्रिम जलकुंडात विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या मूर्तीचे विसर्जन करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे.

विहिरीत विसर्जनाचे नियोजन - मुख्याधिकारी
बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनीही आज पत्रकार परिषद घेत सांगितले की, मूर्ती विसर्जनानंतर त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बारामती नगरपालिकेचीच होती. त्यानुसार वापरात नसलेल्या पण स्वच्छ पाणी असलेल्या विहिरीत विसर्जन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, काही जणांनी वाहने अडवून विसर्जन करण्यास प्रतिबंध केला. नगरपालिका कचरा डेपोमध्ये श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झाले. नगरपालिकेने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, या दृष्टीनेच कार्यवाही केली आहे. मूर्ती विटंबनेचा तर विषयच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com