बारामतीत यावर्षीचा उन्हाळा विना पाणीटंचाईचा

मिलिंद संगई
शुक्रवार, 30 मार्च 2018

दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की धरणातील पाणीसाठा संपुष्टात येतो व नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबते, त्याचा फटका बारामतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला बसत होता.

बारामती - यंदाच्या उन्हाळ्यात बारामतीकरांना पुरेशा दाबाने पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून अजिबात पाणीटंचाई भासणार नाही अशी माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. नीरा डावा कालव्याच्या पाण्यावर बारामतीची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की धरणातील पाणीसाठा संपुष्टात येतो व नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबते, त्याचा फटका बारामतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला बसत होता. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन सिमेंट कॉंक्रीटचा साठवण तलाव उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. 

जुन्या दोन साठवण तलावांना एकत्र करुन त्याचा 128 आणि नवीन तलाव बांधून त्यात 355 असे एकूण 483 दशलक्ष लिटर्स पाणी साठवण क्षमता असलेले दोन साठवण तलाव आता बारामतीकरांच्या दिमतीला आहेत. जवळपास साठ कोटी रुपये खर्चून हे दोन्ही तलाव उभारण्यात आले आहेत. 
नवीन साठवण तलावांच्या पाणी क्षमतेमुळे नीरा डावा कालव्याचे आवर्तन आता 45 दिवस लांबले तरीही बारामतीकरांना दररोज पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या दोन्ही साठवण तलावांच्या क्षमतेमुळे बारामतीकरांमागील उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायमचेच दूर झाले आहे.

Web Title: Baramati does not have any water shortage this summer