​औद्योगिक वीज दरवाढ मुद्यावरुन बारामतीतील उद्योजक आक्रमक

Baramati entrepreneur aggressive because of Industrial power rate increase
Baramati entrepreneur aggressive because of Industrial power rate increase

बारामती शहर - औद्योगिक वीज दरवाढ व पॉवर फॅक्टर दंड आकारणीच्या मुद्यावरुन आज बारामतीतील उद्योजक आक्रमक झाले. बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून उद्योजकांनी निवेदन दिले. तीस ते चाळीस टक्के वीजबिलात वाढ झाल्याने औद्योगिक क्षेत्र हतबल झाल्याची तक्रार उद्योजकांनी यावेळी केली. 

या संदर्भात आज चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता पडळकर यांच्याशी उद्योजकांनी चर्चा केली. नुकत्याच आलेल्या वीजबिलांमध्ये महावितरणने तीस ते चाळीस टक्के इतकी प्रचंड दरवाढ करत उद्योजकांना दिवाळीची भेटच दिल्याचा आरोप उद्योजकांनी केला. 

दहा ते बारा टक्क्यांची वीज दरवाढ होईल असे सांगितले गेले होते, प्रत्यक्षात मात्र चाळीस टक्क्यांपर्यंत वीज देयके वाढवून आल्याने आता उद्योजक पार हतबल झाले आहेत. एकीकडे वीज दरवाढीचा शॉक महावितरणने दिला असून दुसरीकडे चुकीच्या पध्दतीने पॉवर फॅक्टरची आकारणी करत हजारो रुपयांचा दंड उद्योजकांना लावण्यात आला आहे. या दोन्ही बाबींमुळे बारामतीच्या औद्योगिक क्षेत्रच अडचणीत आले आहे. 

या नवीन वीजदरवाढीमुळे उद्योजकांना इतर राज्यातील उद्योगांशी दराबाबत स्पर्धा करणे अशक्य होणार असल्याने अनेक उद्योग अडचणीत येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे कमालीची मंदी असताना आता वीज दरवाढीच्या संकटाने बारामतीतील उद्योजक हवालदिल झाले असून महावितरणने या दरवाढीत सवलत द्यावी व चुकीचा पॉवर फॅक्टर दुरुस्त करावा अशी मागणी आज उद्योजकांनी केली. 

नवीन पॉवर फॅक्टरचे सूत्र अंमलबजावणी करण्यापूर्वी उद्योजकांना प्रशिक्षण देण्याची गरज असून सध्याच्या यंत्रणेत दुरुस्तीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधीही देणे गरजेचे असल्याचीही मागणी चेंबरच्या वतीने पडळकर यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान पडळकर यांनीही उद्योजकांच्या योग्य मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांच्यासह उद्योजक सचिन माने, पांडुरंग कांबळे, शहाजी रणवरे, कैलास शितोळे, भाऊसाहेब तुपे, आशिष पल्लोड, संजय थोरात, अरुण म्हसवडे, महावीर कुंभरकर, महंमद शफिक संकेश्वरकर, बाबासाहेब शेंडे, राजेंद्र साळुंके, नरेश तुपे, के. बी. गायकवाड, सुनील पाटील, कमलेश खेताम आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com