कांदा फुकट वाटून व्यवस्थेवर घातला घाव! (व्हिडिओ)

ज्ञानेश्‍वर रायते
बुधवार, 5 डिसेंबर 2018

फुकट कांदा वाटपावेळी ज्यांनी दानपेटीत थोडेफार पैसे टाकले, ते पैसे मोदी व फडणवीस सरकारला फिरण्यासाठी पाठविणार आहे. आम्हाला राजकारणाचे देणेघेणे नाही. मात्र, कांद्याच्या घसरलेल्या दराची दखल गांभीर्याने घ्यावी, नाहीतर बागायती भागात आत्महत्या वाढतील.
- दिनेश काळे, कांदा उत्पादक शेतकरी, जैनकवाडी (ता. बारामती)

जैनकवाडी येथील शेतकऱ्याने बारामतीतील चौकात मांडले दुःख

बारामती (पुणे): बारामती नगरपरिषदेसमोरच्या चौकात एक शेतकरी आणि त्याची शाळेत शिकणारी दोन मुले निरागस चेहऱ्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांना फुकट कांदा वाटत होती...45 हजार रुपये खिशातून घालून, घामातून पिकवलेला कांदा फक्त 12 हजार रुपये देऊन गेला...उलट तीन हजार रुपये व्याजानं घ्यावं लागले. त्यामुळे रडकुंडीला आलेल्या या बळीराजाने आज दोन मुलांसह चौक जवळ केला...बारामतीतील हे वेगळेच चित्र अनेकांच्या काळजात चर्रर्र करून गेले...

जैनकवाडी (ता. बारामती) येथील दिनेश काळे यांची ही कहाणी. एकीकडे कांद्याचे दर वाढले की, "कांद्याने रडवले,' अशी ओरड करीत उठणाऱ्या शहरी वर्गाला एक वेगळा धक्का देणारी ठरली. काळे यांची बारामती शहरापासून जवळ असलेल्या जैनकवाडी येथे अडीच एकर शेतजमीन आहे. या कोरडवाहू शेतीत त्यांनी मध्यंतरी दीड एकर कांदा लावला. त्यासाठी रोपे, वाफे काढण्यापासून ते मशागतीपर्यंत व काढणीपर्यंत त्यांना एकूण 45 हजार रुपये खर्च आला. त्यांना साडेसात टन कांदा मिळाला. मात्र, कांद्याला प्रतिकिलो एक रुपया, पन्नास पैसे, दीड रुपया, दोन रुपये, असा दर मिळाला. त्यातून सारे मिळून 12 हजार रुपये हातात आले.

कांदा पिकविण्यासाठी काही वेळा विकत पाणी घ्यावे लागले होते. मधल्या काळात फक्त दोन दिवस कांद्याचा दर वाढला. परत घसरला. कांद्यावर सारी भिस्त होती. आता दुष्काळ समोर डोकावतोय. दररोज शाळेत जाणारी पोरं पेन्सिलपासून लागणारा खर्च मागतात, तेव्हा डोळ्यात पाणी येते,' असे काळे सांगत होते.

आज त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि थेट एक फ्लेक्‍स छापून घेऊन थेट कांदा मोफत वाटणार असल्याचे जाहीर केले. समोर दानपेटी ठेवली. कांदा येणाऱ्याजाणाऱ्यांना मोफत वाटला. या वेळी त्यांची मुले प्रसाद व श्रेयस हे दोघेही तेथे बसून होते. त्यांना आपल्या वडिलांचे दुःख सहन होत नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

Web Title: baramati farmer onion rate issue