
Baramati : ग्रामीण क्रिकेटपटूंसाठी अधिक सामने भरविणार - रोहित पवार
बारामती - ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना अधिकाधिक सामने खेळता यावेत या साठी अधिक सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली.
येथील धीरज जाधव क्रिकेट अकादमीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर 14 व 16 वर्षांखालील संमिश्र वयोगटाच्या आंतरजिल्हा ज्युनिअर क्रिकेट करंडक स्पर्धेचे उदघाटन करताना रोहित पवार बोलत होते.
या स्पर्धेत श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब (फलटण), अँव्हेन्यू स्पोर्टस क्लब (सोमेश्वर), आर्च एंजल्स सोशल स्पोर्टस अकादमी (वालचंदनगर), जायब्री स्पोर्टस क्लब (सोलापूर), डी.जे.सी.ए. (बारामती), सारा क्रिकेट क्लब (बारामती), सावळग्राम क्रिकेट संघ (इंदापूर) या संघांनी सहभाग नोंदविला आहे.
नव्याने क्रिकेट खेळ सुरु केलेल्या खेळाडूंसाठी हे सामने आयोजित केल्याचे माजी रणजीक्रिकेटपटू धीरज जाधव यांनी सांगितले.
दरम्यान जिल्हा व तालुका स्तरीय खेळाडूंसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने येणा-या काळात सामन्यांचे आयोजन केले जाईल, युवकांना अधिकाधिक खेळ दाखविण्याची संधी या निमित्ताने मिळेल,
येणा-या मोसमात महाराष्ट्राच्या संघाने रणजी करंडकावर नाव कोरावे हा उद्देश नजरेसमोर ठेवून संघ तयार करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. आपल्या कौशल्यावर पुढे जा, चांगला खेळ करा असेही ते म्हणाले.
या प्रसंगी अमर मुरुमकर, नाना सातव, सुभाष वाबळे, स्वराज वाबळे, जयदीप रसाळ, विजय शिंदे, बाळू शिंदे, सूरज मोरे, पंकज सस्ते, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.