विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध : सुप्रिया सुळे

संतोष आटोळे
शुक्रवार, 6 जुलै 2018

तालुक्यामध्ये दौरा करीत असताना कोठेही पायाभूत सुविधांची गैरसोय असल्याची तक्रार येत नाही. याचा अर्थ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सरकार आता ज्या योजना राबवित आहे.

शिर्सुफळ : घरोघरी गॅस ही संकल्पना केंद्र व राज्य सरकार आता राबवित आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील बहुतांशी भागात हा विकास यापूर्वीच पोचला आहे. यामुळेच विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध आहे, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

कटफळ (ता.बारामती) या मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, युवकाध्यक्ष राहुल वाबळे, अनिल हिवरकर,राजेंद्र काटे, दत्तात्रय आवाळे, अँड.नितीन आटोळे, सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी सुळे म्हणाल्या, तालुक्यामध्ये दौरा करीत असताना कोठेही पायाभूत सुविधांची गैरसोय असल्याची तक्रार येत नाही. याचा अर्थ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सरकार आता ज्या योजना राबवित आहे. त्या बारामतीमध्ये पंचवीस वर्षांपासूनच कार्यान्वित आहेत. या कामाचे कौतुक देशाचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते करीत असतात. यापुढेही विकासाची ही घोडदौड पुढे चालवीत बारामतीची आन, बान आणि शान कायम राखणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सुळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व आयुका संस्थेच्या वतीने प्रत्येक अवकाशाच्या माहिती देणाऱ्या तारांगणचे प्रातिनिधिक उद्घाटन करण्यात आले.

तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत मोकाशी, सूत्रसंचालन ग्रामसेवक अमोल घोळवे यांनी तर आभार संग्राम मोकाशी यांनी मानले.

तालुकाध्यक्षांच्या कामाचे कौतुक...

यावेळी खासदार सुळे यांनी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्य संभाजी होळकर यांचे विशेष कौतुक केले. यासर्व विकासकामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्यासह पूर्वीचे बांधकाम व आरोग्य सभापती व पक्षाचे तालुकाध्यक्ष यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विकासकामांसह पक्षाची चांगली संघटना बांधली. तसेच पक्षवाढीसाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी  सांगितले.

Web Title: Baramati model of development is famous in the country says Supriya Sule