घनकचरा व्यवस्थापनाबाबत बारामती पालिका उदासीन  

घनकचरा.jpg
घनकचरा.jpg

बारामती (पुणे) : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बारामती नगरपालिका काहीच करत नाही, असे चित्र आहे. राज्य सरकारने मंजुरी देऊन आता वर्ष उलटून गेले तरी नगरपालिकेकडून कार्यवाही नाही. 

नगरविकास विभागातर्फे कचरा डेपोंचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राज्यातील नगरपालिकांसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली होती. यात "अ' वर्ग नगरपालिका असलेल्या बारामतीलाही 12 कोटी 82 लाख रुपये किंमतीच्या प्रकल्पास मंजूरी दिली. यात बायोमायनिंग या प्रकल्पावरील 5 कोटी 40 लाखांचा खर्च नगरपालिकेने स्वतःच्या उत्पन्नातून करायचा आहे. बारामती नगरपालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता नगरपालिकेला एकदम इतकी रक्कम या प्रकल्पासाठी टाकणे शक्‍य नसल्याची माहिती पुढे येत आहे. 

या प्रकल्पासाठी 35 टक्के केंद्र, राज्य सरकार पावणे दोन कोटींची रक्कम अनुदान स्वरूपात देणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातून मिळणा-या निधीतून नगरपालिकेने तीन कोटी रुपये यात खर्च करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पात विहीत कालावधीत प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, घनकच-याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून ओला व सुका कचरा वेगळा गोळा करणे अत्यावश्‍यक असेल. 
सरकारच्या सूत्रांनुसार जानेवारी 2019 पर्यंत शहरात दररोज निर्माण होणा-या घनकच-यापैकी 90 टक्के घनकचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करुन संकलित करणे बंधनकारक होते, प्रत्यक्षात जानेवारी 2020 उजाडण्याची वेळ येऊनही नगरपालिकेने याबाबत काहीही केलेले नाही. 

ओल्या कच-यावर केंद्रीत अथवा विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया सुरु करणे यात बंधनकारक आहे. मुळात नगरपालिकेकडून अजून ओला व सुका कचरा वेगळा गोळा केलाच जात नाही. बायोमायनिंग प्रकल्पामध्ये कचरा डेपोच्या जागेपैकी 90 टक्के जागा पुर्नप्राप्त करुन घेण्याची जबाबदारी बारामती नगरपालिकेची असेल, बायोमायनिंग प्रक्रियेनंतर तेथे निर्माण होणा-या उत्पादनाची व उर्वरित कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपालिका किंवा नियुक्त एजन्सीची असेल या सारख्या अटी घालूनच सरकारने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी एक कोटींची तरतूद आहे. लोकसहभाग या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. 
 
असा आहे प्रकल्प 
-12 कोटी 82 लाखांचा प्रकल्प 
-ओला व सुका कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया 
-कचरा निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून प्रक्रिया 
-केंद्रित व विकेंद्रीत पध्दतीने कच-यावर प्रक्रिया 
-कचरा डेपो संकल्पना कालबाह्य होणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com