बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले पार्थिवावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

कोरोना संशयित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर बारामती नगरपालिकेच्या चार कर्मचा-यांनी संबंधित पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

बारामती : कोरोना संशयित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर बारामती नगरपालिकेच्या चार कर्मचा-यांनी संबंधित पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. बारामतीत अशा प्रकारे पीपीई किट परिधान करून एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच घटना होती. 

तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा आज पुण्याला हलविताना मृत्यू झाला. संबंधित नागरिकाच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये घेण्यात आले होते. मात्र त्याच्या अहवालाचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नव्हता, त्यामुळे कोरोना संशयित म्हणून त्यांची वर्गवारी करण्यात आली होती. त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले नाही. 

हे वाचा - धक्कादायक ! कोरोना संशयितांना अर्ध्या रस्त्यातूनच परतावे लागले घरी

दरम्यान आज बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चार कर्मचा-यांनी पीपीई किट परिधान करुन संपूर्ण काळजी घेत अमरधाम स्मशानभूमीमध्ये मुख्याधिकारी किरणराज यादव व आरोग्य निरिक्षक सुभाष नारखेडे यांच्या देखरेखीखाली पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अशा रुग्णांसाठी असलेल्या विशिष्ट बॅगमध्ये मृतदेह ठेवून नंतर अंत्यसंस्कार केले गेले. या नंतर या चारही कर्मचा-यांना सात दिवसांची रजा देण्यात आली असून त्यांनी घरीच राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. आशा कर्मचारी दैनंदिन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार असल्याचे किरणराज यादव यांनी सांगितले.

हे वाचा - गेले चार महिने 'ती' वाघिण लढतीये कोरोनाबाधितांसाठी

दरम्यान नगरपालिकेने हे अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांकडून संमतीपत्रक घेऊन तसेच अशा रुग्णाच्या बाबतीत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन ही प्रक्रीया पार पाडली गेली. या अंत्यसंस्कारानंतर अमरधाम स्मशानभूमीचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. संबंधित चार कर्मचा-यांना सात दिवसानंतर पुन्हा तपासून गरज वाटल्यास आणखी सात दिवसांची रजा दिली जाईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati nagar palika workers did last rites on man body whose corona report not available