Baramati News : अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रम मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

Baramati News : अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रम मंजूर

बारामती - येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला असून दहा विद्यार्थ्यांना मान्यता मिळाली असून त्याची प्रवेशप्रक्रीया प्रारंभ झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली.

या महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस. पदवीसाठी शेवटच्या वर्षाचे सर्व म्हणजे शंभर विद्यार्थी दाखल झाले असून आता बारामतीच्या वैदयकीय महाविद्यालयात आता पाच वर्षांसाठीचे मिळून पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दरम्यान शरीरक्रिया शास्त्र या विषयासाठी चार तर रोगप्रतिबंधक शास्त्र या विषयासाठी सहा अशा दहा विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळाली आहे. या पैकी पहिल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशही झाला असून उर्वरित विद्यार्थी आल्यानंतर बारामतीत पदव्युत्तर वैदयकीय शिक्षणही या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार असल्याचे उपअधिष्ठाता डॉ. अंजली शेटे यांनी नमूद केले.

या शिवाय नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पीएच.डी. साठीही मान्यता दिली असून चार विद्यार्थी बारामतीतून पीएच.डी. देखील करणार आहेत.

बारामतीच्या वैदयकीय महाविद्यालयाचा महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रीयेबाबत चौथा क्रमांक असून विद्यार्थी व पालक बारामतीच्या महाविद्यालयास प्राधान्य देत असल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले. महाविद्यालयातील विद्यार्थी वीरप्रताप सिंग यास दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च या संस्थेच्या दोन फेलोशिप मिळाल्या असून त्याला या साठी 50 हजार रुपये प्राप्त होणार आहेत. सलग दोन वर्षे त्याने सादर केलेल्या दोन्ही प्रकल्पांना फेलोशिप प्रदान केली गेली. महाविद्यालयाचा सरासरी निकाल 96 टक्के इतका असल्याचेही डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी नमूद केले.