अभियंता नवरीचे बैलगाडीतून वऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सोमेश्वरनगर - वाणेवाडी (ता. बारामती) येथील मळशी गावातून एक वऱ्हाड निघाले होते. पण वऱ्हाडासमोर डीजे वा बॅंड नव्हता. वऱ्हाडासाठी चारचाकी वाहनांचा फौजफाटा नव्हता. वऱ्हाड नवरीला घेऊन बैलगाडीतून चालले होते. यामुळे पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. 

वाणेवाडी येथील रामराजे सोसायटीचे कर्मचारी अरुण भोईटे यांची मुलगी स्नेहल हिचे लग्न पुरंदर तालुक्‍यातील साकुर्डे येथील सागर सस्ते या मुलाशी झाले. वधू-वर दोघेही पुण्यामध्ये हिंजवडीतील आयटीपार्कमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक अभियंता नवरी म्हटल्यावर हायफाय सजविलेल्या गाडीतून लग्नासाठी नेणे अपेक्षित असते. परंतु मुलीने आपले नातेवाईक शशिकांत जगताप यांना मला बैलगाडीतून लग्नकार्यालयापर्यंत जायचे आहे अशी आगळीवेगळी भूमिका मांडली. मळशी गावात बैलगाड्याच उरल्या नाहीत. जगताप यांनी निंबूत, वाघळवाडी गावातून पाच-सहा बैलगाड्या आणल्या. सकाळी मळशीतून वाघळवाडी येथील सोमेश्वर पॅलेस हे तीन किलोमीटर अंतर नवरीने बैलगाडीतून पार केले. सजविलेल्या बैलगाडीत डोक्‍यावर पदर घेऊन उभी असलेली नवरी, तिच्या सोबतच्या कलवऱ्या आणि बैलगाडीसमोर हलगी वाजविणारे वाद्यवृंद अशी वरात निघाली होती. अनेकांनी आधुनिक ओंगळपणा सोडून दिल्याबद्दल नवरीचेही कौतुक केले. सोमेश्वर पॅलेस येथे तर लोकांनी गर्दी केली होती. अनेक तरुण बैलगाडीसह सेल्फी घेत होते. 

Web Title: baramati news Engineer bride Wedding