तलाठ्यास मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांच्या अटकेची मागणी

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 26 मे 2017

कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. याबाबत तलाठ्यांनी चिंता व्यक्त केली. मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी तलाठी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

वडगाव निंबाळकर : कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील तलाठी अकुंश भगत यांना मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांना तीन दिवसांत अटक करावी; अन्यथा बेमुदत बंद करण्याचा इशारा बारामती तलाठी संघटनेने दिला आहे. 

नीरा नदीतून वाळूउपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांनी बुधवारी (ता. 24) भगत यांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात लाटे येथील सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती तलाठी संघटनेने गुरुवारी (ता. 25) एक दिवसाचा लाक्षणिक बंद केला.

गौण खनिजाचे अवैध उत्खनन महसूल विभागाने रोखले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होते. मात्र, महसूल कर्मचाऱ्यांचेच जीवन धोक्‍यात आले आहे. कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. याबाबत तलाठ्यांनी चिंता व्यक्त केली. मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी तलाठी संघटनेच्या वतीने करण्यात आली. येत्या सोमवारपर्यंत (ता. 29) या वाळूमाफियांना अटक न झाल्यास राज्य संघटनेच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

महसूल विभागाकडून संबंधितांकडे पत्र पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. निवेदनावर बारामती तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील इंगुले उपाध्यक्ष विनोद धापटे, जिल्हा तलाठी संघटनेचे खजिनदार महेश गायकवाड, जिल्हा संघ प्रतिनिधी विश्वास शिंदे, तालुका संघटक वैभव टकले, कार्याध्यक्ष आर. आर. जगदाळे यांच्यासह तालुक्‍यातील मंडल अधिकारी व विविध तलाठ्यांच्या पन्नास सह्या आहेत.

Web Title: baramati news sand mafia attacks talathi