बारामतीत प्रथमच 'सायकल बँक'चा उपक्रम; तीन हजार मुलींना सायकल वाटप

मिलिंद संगई
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

बारामती - शाळेत जाण्यासाठी वाहतूकीचे साधन नाही, या कारणाने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी बारामतीत प्रथमच सायकल बँकचा उपक्रम प्रत्यक्षात येणार आहे. बारामती पंचक्रोशीतील तीन हजार मुलींना या उपक्रमातून मोफत सायकल उपलब्ध होणार आहे. 

बारामती - शाळेत जाण्यासाठी वाहतूकीचे साधन नाही, या कारणाने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी बारामतीत प्रथमच सायकल बँकचा उपक्रम प्रत्यक्षात येणार आहे. बारामती पंचक्रोशीतील तीन हजार मुलींना या उपक्रमातून मोफत सायकल उपलब्ध होणार आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून हा कायमस्वरुपी उपक्रम येत्या गुरुवारी (ता. 5) या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत गदिमा सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता होत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील क्रिकेटपटू पूनम राऊत, स्मृती मंधाना व मोना मेश्राम याही या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. 

रोटरी डिस्ट्रीक्ट 3141, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअर, एम्पयी फाऊंडेशन, क्रिफ्स चॅरिटेबल ट्रस्ट, स्विफ्ट इंडिया लिमीटेड या मुंबईतील देणगीदारांनी या तीन हजार सायकलींसाठी जवळपास दीड कोटी रुपयांची देणगी उपलब्ध करुन दिली आहे. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान व मेंटर्स फाऊंडेशन हे या उपक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत.

ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेताना शाळेचे घरापासूनचे अंतर जर लांब असेल; तर या कारणावरुन अनेकदा मुलींची शाळा बंद होते. या मुलींना जर सायकल उपलब्ध करुन दिली गेली तर मुलींची शाळेतील गळती कमी होते, ही बाब सांगली जिल्ह्यात प्रयोगाअंती स्पष्ट झाले. त्यामुळे बारामती तालुक्यातही हा उपक्रम राबविला जाणार आहे. केवळ गळती कमी होते इतकेच नाही; तर मुलींची अभ्यासात प्रगतीही होते आणि त्यांची तब्येतही सायकल चालविल्यामुळे उत्तम राहते, असे पाहणीनंतर दिसून आले. 

शिक्षण होईपर्यंत ही सायकल संबंधित मुलीकडेच राहणार आहे आणि शिक्षण संपल्यानंतर ही सायकल त्या मुलीने शाळेकडे परत करायची. ती सायकल नव्याने शाळेत येणा-या मुलीला परत द्यायची असा हा सायकल बँकचा उपक्रम असल्याची माहिती या उपक्रमाचे समन्वयक डॉ. संतोष भोसले, नगरसेवक किरण गुजर आदींनी दिली. 

ऐतिहासिक उपक्रम
बारामतीच्या इतिहासात एकाच वेळेस तीन हजार मुलींना मोफत सायकल प्रदान करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने या बद्दल विशेष उत्सुकता आहे. स्वताः ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे या उपक्रमात जातीने लक्ष पुरवित आहेत. मुलींचे गळतीचे प्रमाण शून्यावर यावे आणि समाजात मुख्य प्रवाहात त्यांचे स्थान मुलांच्या बरोबरीने असावे, असा हा उपक्रम राबविण्यामागे हेतू आहे.

Web Title: baramati news: sharad pawar girls education