राष्ट्रवादीसाठी पदाधिका-यांनी वेळ द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीनिमित्त आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar : राष्ट्रवादीसाठी पदाधिका-यांनी वेळ द्यावा

बारामती - आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती व दूध संघाच्या निवडणूकीमध्ये काही नवीन तर काही जुन्य चेह-यांना संधी दिली जाईल, मात्र सर्वच पदाधिका-यांनी पक्षासाठी वेळ दिलाच पाहिजे, असा इशाराही आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीनिमित्त आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. संभाजी होळकर, जय पाटील, वनिता बनकर, अनिता गायकवाड, अविनाश बांदल, सचिन सातव, किरण गुजर, बाळासाहेब तावरे, प्रशांत काटे, पुरुषोत्तम जगताप, प्रणिता खोमणे, दत्तात्रय आवाळे, संदीप जगताप, नितिन शेंडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

या निवडणूकीतील उमेदवारांची यादी दिली जाईल, या वेळी मुलाखती घेणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आजच्या आपल्या भाषणात अजित पवार यांनी पक्ष संघटनेसाठी वेळ न देणा-या पदाधिका-यांना आपल्या शैलीत खडे बोल सुनावले.

पवार म्हणाले, माझ्यासह सुप्रिया व इतर प्रमुख नेते जबाबदारी असून आम्ही आमच्या कामासाठी वेळ देतो, पण काही पदाधिकारी झाल्यावर वेळ देत नाही व पक्षाच्या आंदोलन किंवा इतर उपक्रमाकडे पाठ फिरवतात, हे चालणार नाही. प्रत्येकाने वेळ वाटून घ्यायला हवा. या पुढील काळात जे पदाधिकारी अशा उपक्रमांना येणार नाहीत त्यांची यादीच माझ्याकडे द्या, मी बघतो पुढे काय करायचे ते, अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान बूथ कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेणार असून बूथ कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 25 कुटुंबाशी वैयक्तिक संपर्क ठेवा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, असा सल्लाही दिला. संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले, ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

वाचाळवीरांना महत्व देऊ नका...

बारामतीत येऊन वल्गना करणा-या वाचाळवीरांकडे लक्ष देऊन त्यांचे महत्व वाढवू नका, विकासकामांवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्याचे त्यांनी सुचविले.

टॅग्स :Ajit PawarBaramatiNCP