बारामती- फलटण रेल्वेचे काम या कारणामुळे रखडले 

railway
railway

बारामती शहर (पुणे) : महत्त्वाकांक्षी बारामती- फलटण रेल्वेच्या भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. 

दौंड- बारामती- फलटण- लोणंद मार्गे पुढे दक्षिणेकडे हा मार्ग अतिशय जवळचा असल्याने रेल्वेच्या दृष्टीने हा टप्पा लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. फलटण- लोणंद हा टप्पा पूर्ण झालेला असून, बारामती- दौंड या मार्गावरही रेल्वे धावते आहे. बारामती- फलटण हा मार्ग वेळेत पूर्ण करण्याची गरज होती. या मार्गावर बारामती एक मोठे स्थानक होऊ शकते. 


निधीची कमतरता भासू नये, याची रेल्वे विभागाच्या वतीने पूर्ण काळजी घेण्यात आली होती. रेल्वेने या मार्गाच्या भूसंपादनासाठी 115 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरितही केले होते. मात्र, काही गावात लोकांनी जमिनी दिल्या, तर काही गावात लोकांनी विरोध केला. त्यामुळे या मार्गाबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे. 

लोकसभेच्या आचारसंहितेपासूनच या कामात खंड पडला. त्यानंतर या कामाने वेगच घेतलेला नाही. हा रेल्वेमार्ग जितका उशीर होईल, तितका महाग होत जाणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने वेगाने भूसंपादन करण्याचा प्रयत्न करण्याची रेल्वेची मागणी आहे. 

तेरा गावांतील 184 हेक्‍टर क्षेत्र 
रेल्वेच्या या 37 किलोमीटर अंतरासाठी लाटे, माळवाडी, बऱ्हाणपूर, तांदूळवाडी, नेपतवळण, कऱ्हावागज, सावंतवाडी कटफळ, सोनकसवाडी, थोपटेवाडी, कुरणेवाडी, ढाकाळे, खामगळवाडी या तेरा गावांमधील 184 हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन महसूल विभागाच्या वतीने केले जात आहे. यापैकी लाटे व माळवाडी या गावातील जमिनींची खरेदी झाली असून, दस्तही झाले आहेत. बऱ्हाणपूर, नेपतवळण, सावंतवाडी व तांदूळवाडी या चार गावातील मोजणी पूर्ण झाली असून, मूल्यांकनाचे फेरप्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आहेत. कऱ्हावागज, थोपटेवाडी, सोनकसवाडी व कटफळ येथील मोजणी झाली असून, मूल्यांकन प्रतीक्षेत आहे. कुरणेवाडी, खामगळवाडी व ढाकाळे येथील मोजणी अद्यापही पूर्ण झाली नाही. या भागातील काही शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com