
Baramati : बारामती फलटण रेल्वे मार्गाची निविदा प्रक्रीया लवकरच सुरु होणार!
बारामती : गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या बारामती-फलटण या रेल्वे मार्गाचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल अशी अपेक्षा रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
फलटण येथे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या रेल्वे मार्गाचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वे मार्गाची निविदा प्रक्रीया लवकरच निघणार आहे.
बारामती फलटण या रेल्वे मार्गाचे भूसंपादन वेगाने सुरु असून जवळपास 70 टक्के भूसंपादन पूर्ण झालेले आहे. त्या मुळे आता रेल्वेकडूनही हा मार्ग टाकण्यासाठी प्रक्रीया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात या मार्गासाठी जवळपास सातशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या मार्गावरील सर्व लहान मोठे पूल, अंडरपास, रेल्वे क्रॉसिंग किंवा उड्डाण पूल यांची कामे व माळवाडी, ढाकाळे व न्यू बारामती या तीन रेल्वे स्थानकांचीही कामे यांचा यात समावेश असेल. बारामती व फलटण या दोन्ही बाजूंकडून हे काम एकाचवेळेस सुरु करण्यात येणार असल्याचीही माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान बारामती शहरातील जुने रेल्वे स्थानक तसेच कायम राहणार असून कटफळ रेल्वे स्थानकापासून बाहेरच्या बाजूने नवीन रेल्वे मार्ग जाणार असून तो नवीन बारामती रेल्वे स्थानकाला नेपतवळणनजिक जाऊन मिळेल.
काम सुरु झाल्यापासून एक वर्षात रेल्वे मार्ग टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट रेल्वेने निश्चित केलेले आहे. बारामती ते फलटण हा 38 कि.मी. चा रेल्वे मार्ग असेल. फलटण लोणंद या रेल्वे मार्गाचे काम अगोदरच पूर्ण झालेले असल्याने बारामती फलटण हे काम पूर्ण झाल्यानंतर दौंड-बारामती-फलटण-लोणंद या मार्गे दक्षिण भारतात कमी वेळात अधिक वेगाने पोहोचता येईल.
सध्या दौंडहून लोणंदला रेल्वेने जायचे म्हटल्यास दौंड ते पुणे व पुणे ते लोणंद असे जावे लागते. नवीन मार्गामुळे दौंड बारामती फलटण मार्गे लोणंदला कमी अंतरात वेगाने पोहोचता येईल.
सक्तीने भूसंपादन....
रेल्वे मार्गासाठी आता शासनाकडून सक्तीने भूसंपादन प्रक्रीया राबविली जाणार आहे. शासकीय जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रीया सुरु असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सक्तीने जमीन अधिग्रहीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विशिष्ट वेळेत हे भूसंपादन पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.