
बारामती-फलटण रेल्वे मार्गाचे महिन्यात 100 एकरांचे भूसंपादन
बारामती - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती-फलटण आणि पुणे-मिरज रेल्वेमार्गासाठी बारामती तसेच दौण्ड- पुरंदर उपविभागाने वेगाने भूसंपादनाची कार्यवाही केली असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती मिळाली आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत 100 एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन करण्यात आले आहे.
बारामती-फलटण नवीन एकेरी रेल्वे मार्गाची एकूण 63.65 किमी लांबी असून त्यापैकी 37.20 किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बऱ्हाणपूर, नेतपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कऱ्हावागज, सावंतवाडी व तांदुळवाडी या 12 गावातील खासगी जमिनीचे भूसंपादन करायचे आहे. या सर्व गावातील जमीनीचे दर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दर निश्चिती समितीने निश्चित केले आहेत. या 12 गावांव्यतिरिक्त कटफळमधील एमआयडीसीची जमिन प्रकल्पासाठी हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या 184 हेक्टर जमिनीपैकी 70 हेक्टर जमीन थेट खरेदीने संपादित करण्यात आलेली आहे. त्यापैकी 80 एकराची खरेदी गेल्या एकाच महिन्यात करण्यात आलेली आहे. सुमारे साडेसात हेक्टर वन जमीन असून ही जमिन हस्तांतरीत व्हावी यासाठी वनविभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
जमीन खरेदीसाठी प्राप्त 115 कोटी रुपये निधीपैकी 100 कोटी रुपये खर्च झाले असून पुढील खरेदी प्रक्रियेसाठी निधी मागणी प्रस्ताव दाखल केला आहे. उर्वरित सर्व खासगी जमिनीची खरेदी प्रक्रिया जून 2022 अखेर पूर्ण करण्याचे प्रशासनाने प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
'महसूल, वनविभाग, रेल्वे तसेच मुद्रांक विभागांच्या योग्य समन्वयामुळे रेल्वे प्रकल्पांचे काम लवकर सुरू होणार आहे. भूसंपादनासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तसेच दौण्ड- पुरंदर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. मुद्रांक विभागाने प्रकल्पासाठीच्या जमीनीची खरेदीखते करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीदेखील तसेच रात्री उशीरापर्यंत काम केले. हे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाचे असून उर्वरित जमीन खरेदी लवकरच पूर्ण करु असा विश्वास आहे.'
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे.
Web Title: Baramati Phaltan Railway Route 100 Acer Land Acquisition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..