बारामतीत पाणी सोडले पोलिस बंदोबस्तात 

विजय मोरे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शुक्रवारी (ता. 30) रात्री पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. त्यामुळे लाभधारक गावांत समाधानाचे वातावरण आहे. 

उंडवडी (पुणे) : बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शुक्रवारी (ता. 30) रात्री पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. त्यामुळे लाभधारक गावांत समाधानाचे वातावरण आहे. 

शिरसाई योजना 4 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. मात्र, सहा दिवसांनंतर शिर्सुफळ येथील तलावातील पाणी संपल्यानंतर 10 ऑगस्टपासून योजना बंद पडली होती. आता शिर्सुफळ तलावात खडकवासला कालव्याचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर योजना सुरू करण्यात येणार होती. मात्र, साबळेवाडीतील शेतकरी व अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला होता.

साबळेवाडीतील शेतकऱ्यांनी, "पहिल्यांदा आम्हाला पाणी सोडा; अन्यथा कालव्याला पाणी सोडू देणार नाही,' अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शिरसाई कालव्यातून पाणी सोडण्यास अडचण निर्माण होत होती.

अखेर साबळेवाडी येथील तलावात योजनेद्वारे दीड पंपाद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय झाला. अखेर शुक्रवारी सायंकाळी सव्वाआठ वाजता शिरसाई डावा व उजव्या कालव्याला पोलिस बंदोबस्तात सहा पंपांद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. शिरसाई डाव्या कालव्याद्वारे बऱ्हाणपूर येथील तलावात व उजव्या कालव्याद्वारे खराडेवाडी तलावात आणि साबळेवाडी तलावात दीड पंपाद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. 

शिरसाई कालव्याला पाणी सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात फायदा होईल; तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही मार्गी लागण्यास मदतच होईल, असे मत उंडवडी सुपेचे सरपंच एकनाथ जगताप व उपसरपंच पोपट गवळी यांनी व्यक्त केले. 

शिरसाईच्या लाभधारक क्षेत्रातील प्रत्येक गावाला योजनेद्वारे पाणी देण्यात येईल. या योजनेसाठी अपेक्षित पाणीसाठा शिर्सुफळ तलावात होत आहे. त्यामुळे लाभधारक गावात पाणी देण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 
- एल. जी. भोंग, 
शाखा अभियंता, शिरसाई उपसा सिंचन योजना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati- The Police released the water from the Shirasai scheme