‘सायकल बॅंक’ चळवळ ठरावी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

बारामती - ‘‘मुलींमधील कर्तृत्वाला सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलींची शाळेतील गळती कमी व्हावी यासाठी बारामतीत सुरू झालेला सायकल बॅंक हा उपक्रम राज्यात दिशादर्शक चळवळ बनली पाहिजे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. 

बारामती - ‘‘मुलींमधील कर्तृत्वाला सतत प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलींची शाळेतील गळती कमी व्हावी यासाठी बारामतीत सुरू झालेला सायकल बॅंक हा उपक्रम राज्यात दिशादर्शक चळवळ बनली पाहिजे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. 

रोटरी डिस्ट्रिक्‍ट ३१४१, रोटरी क्‍लब ऑफ बॉम्बे पिअर, एम्पथी फाउंडेशन, क्रिफ्स चॅरिटेबल ट्रस्ट, स्विफ्ट इंडिया लिमिटेड यांच्या देणगीतून बारामती तालुक्‍यातील तीन हजार मुलींना गुरुवारी सायकली वाटण्यात आल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष जय पाटील, उपसभापती शारदा खराडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. भारतीय महिला क्रिकेट संघातील पूनम राऊत, स्मृती मंधाना व मोना मेश्राम यांचा क्रिकेटमधील योगदानाबद्दल शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘‘नेदरलॅंडसारख्या देशात पंतप्रधान व मंत्रिमंडळही सायकलचा वापर करते. भारतातही ही चळवळ रुजायला हवी. शाळेत चालत जावे लागते, त्यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होऊन मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांना साधन उपलब्ध करून दिले, तर त्या आपले कर्तृत्व नक्की सिद्ध करून दाखवतील.’’ एम्पथी फाउंडेशनचे राजन छेडा व सैफ कुरेशी यांनी आणखी काही सायकली देण्याचा मनोदय भाषणातून बोलून दाखविला. तोच धागा पकडून या मान्यवरांकडून मिळणाऱ्या सायकलींपैकी दोन हजार सायकली पुरंदर व एक हजार सायकली दौंड तालुक्‍यातील मुलींना दिल्या जातील, असे शरद पवार यांनी या वेळी जाहीर केले. गुणवत्ता आहे, मात्र आर्थिक परिस्थिती नाही, असा बारामती तालुक्‍यातील एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना पवार सार्वजनिक न्यास व विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षणासाठी सर्वतोपरी साह्य केले जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी या वेळी दिली. ज्या तीन हजार मुलींना सायकली दिल्या गेल्या आहेत, त्यांवर त्या मुलींचाच हक्क आहे.

कुटुंबातील इतरांनी ती सायकल वापरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 
सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविकात मुलींना दिली गेलेली ही सायकल म्हणजे दिवाळी भेट असल्याचे नमूद केले. सायकल चालविताना सुरक्षेसाठी हेल्मेटची गरजही त्यांनी बोलून दाखविली. संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संतोष भोसले यांनी आभार मानले. पूनम राऊत, रोटरीचे डिस्ट्रिक्‍ट गर्व्हनर प्रफुल्ल शर्मा, एम्पथीचे राजन छेडा तसेच सैफ कुरेशी यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: baramati pune news cycle bank Movement resolves