...तरच कुटुंबाचे हित साधले जाऊ शकते: पुलकसागरजी महाराज

मिलिंद संगई
रविवार, 30 जुलै 2017

चातुर्मासानिमित्त बारामतीतील श्री दिगंबर जैन समाजबांधवांच्या वतीने आयोजित महाराजांच्या ज्ञानगंगा महोत्सवाचा प्रारंभ बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत आज झाला.या प्रारंभाच्या पहिल्या दिवशी पुलकसागरजी महाराजांनी प्रेम जीवनाचा महामंत्र या विषयावर आपले विचार व्यक्त करुन श्रावक श्राविकांची मने जिंकून घेतली.

बारामती : बदलत्या काळात एकत्र कुटुंब पध्दतीचा ऱहास होतो आहे, परस्पर प्रेम व स्नेह कायम राहिला तरच कुटुंब एकसंघ राहून त्या कुटुंबाचे हित साधले जाऊ शकते, असे प्रतिपादन प.पू. 108 पुलकसागरजी महाराजांनी आज केले. 

चातुर्मासानिमित्त बारामतीतील श्री दिगंबर जैन समाजबांधवांच्या वतीने आयोजित महाराजांच्या ज्ञानगंगा महोत्सवाचा प्रारंभ बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत आज झाला.या प्रारंभाच्या पहिल्या दिवशी पुलकसागरजी महाराजांनी प्रेम जीवनाचा महामंत्र या विषयावर आपले विचार व्यक्त करुन श्रावक श्राविकांची मने जिंकून घेतली. अत्यंत ओघवत्या शैलीत सुंदर उदाहरणांसह महाराजांनी परस्परप्रेमाची भावना वाढविण्याचे आवाहन केले. 

आज कुटुंबातील सदस्यापेक्षाही बाहेरच्या लोकांसाठी आपण प्रेमभावना ठेवतो पण कुटुंबियाप्रती ती भावना असत नाही, दोन भाऊ एकत्र बसून जेवत नाहीत, छोट्या गोष्टींवरुन न्यायालयाची पायरी चढली जाते, छोट्या गोष्टींसाठी संबंध खराब होतात, मात्र वैरत्वातून काहीच पदरात पडत नाही त्या मुळे अहंकार सोडून द्यायला हवा असे महाराज म्हणाले. बायकांनी जिद्द व पुरुषांनी अहंकार दूर केल्यास घऱाचा स्वर्ग होण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

आपल्यापैकी कोणाच्याच जीवनाचा काहीही भरवसा देता येत नाही, जर आपल्यालाच आपले जीवन किती आहे हे माहिती नसेल आणि जीवनच नश्वर असेल तर मग वैरत्वाचे भाव मनात का ठेवता, असा प्रश्न महाराजांनी उपस्थित केला. जो पर्यंत घरात ज्येष्ठ लोक आहेत तो पर्यंत त्यांना निर्णय घेऊ द्या आणि ज्येष्ठांनीही निर्णय घेताना मुलांना विश्वासात घेतले तर त्या घरात आनंद नांदेल असा सल्ला त्यांनी दिला. 
चौकट- प्रेमाचा धागा कधीच तोडू नका

मातापित्यांप्रती प्रेमभाव कायम ठेवा, कुटुंबाने एकत्र राहून प्रेमाने जीवन व्यतित करायला हवे, प्रेमाचा धागा हाच कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतो त्या मुळे घरात सर्वांनी एकत्र बसून भोजन करा आणि समाजात एकत्र येऊन सामूहिक भजन करा, त्यानेच प्रेमभावना कायम राहिल, असा सल्ला पुलकसागरजी महाराजांनी आज दिला. 

Web Title: Baramati pune news Pulaksagar Maharaj